
मुंबई विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पदवी प्रमाणपत्रांच्या बोधचिन्हातील चूक कॉलेज प्रशासनाच्या चांगलीच अंगलट आली आहे. विद्यार्थ्यांना वाटलेली प्रमाणपत्रे तातडीने परत घेऊन पुन्हा विद्यापीठाकडे पाठवण्याची नामुष्की मुंबईतील विविध महाविद्यालयांवर ओढवली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांनाही मनस्ताप झाला असून कॉलेज प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.
प्रमाणपत्रात मुंबईचे स्पेलिंग चुकवल्याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनावर टीकेची झोड उडवली जात आहे. 1 लाख 64 हजार 465 विद्यार्थ्यांना पदवी देण्यासाठी त्यांच्याकडून 250 रुपये आकारण्यात आले. विद्यापीठ प्रशासनाच्या चुकीच्या कामाचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून या प्रकरणी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठ कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुळकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घेत त्यांना जाब विचारला आहे. व्हीजेटीआय, पोद्दार अशा सर्वच महाविद्यालयांनी सदोष प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना वाटली असून ही प्रमाणपत्रे पुन्हा मिळवण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून पुन्हा प्रमाणपत्रे गोळा करणे व ती विद्यापीठ प्रशासनाकडे सुपूर्द करणे यात कॉलेज प्रशासनाचा बराच वेळ खर्च होणार आहे.
प्रमाणपत्र छापणाऱ्या संस्थेवर कारवाई करा
सदोष प्रमाणपत्रांमुळे मुंबई विद्यापीठ प्रशासनाची नाचक्की झाली असून मोठय़ा नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्यात यावी तसेच सदोष प्रमाणपत्र छापणाऱ्या हैदराबाद येथील संस्थेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना केली आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी चंद्रकांत पाटील यांना सादर केले आहे.
सदोष प्रमाणपत्रे पुन्हा परत घ्या, युवासेनेची महाविद्यालयांकडे मागणी
सदोष प्रमाणपत्रांचा त्रास भविष्यात विद्यार्थ्यांना होऊ शकतो. त्यामुळे दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना वाटलेली सदोष प्रमाणपत्रे तातडीने परत घ्या अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. रामनिरंजन पोद्दार महाविद्यालयाच्या प्राचार्या विनिता पिंपळे यांची युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले. निवेदन देते वेळी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, नीलेश बडदे, रितेश सावंत, अमोल गुरव आदी उपस्थित होते.