
आम्हीही सूर मारू शकतो, आम्ही पाण्याशी स्पर्धा करू शकतो, आम्हीही उत्साहात खेळू शकतो, असे स्फूर्तीदायक दृश्य दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात पाहायला लाभले. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231-ए आणि नृत्येश्वर फाऊंडेशन ऑफ आर्टस् ऍण्ड कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारीरिक दिव्यांग, अंध आणि गतिमंद अशा तीन गटांत पार पडलेल्या राज्यस्तरीय खुल्या जलतरण स्पर्धेत दिव्यांगांनी मारलेला सूर लक्षवेधी ठरला. फ्री स्टाईल, ब्रेस्ट, बॅक आणि बटरफ्लाय या चार प्रकारात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील 17 जिह्यांमधून 150 हून अधिक पॅरा-स्वीमर्सनी सहभाग घेतला.
खेळांच्या विश्वात पॅराऍथलीटही आपले कौशल्य दाखवण्यात मागे नसल्याचे गेल्या वर्षी पॅरिसमध्ये अवघ्या जगाने अनुभवले होते. त्याचीच एक झलक दादरलाही पाहायला मिळाली. विविध गटांत झालेल्या प्रकारांमध्ये जिया राय, बीडची आभा मुंडे, सिद्धी पाटील, गौरी गर्जे, यशस्वी निर्मळे, सिद्धी भंडारकर या दिव्यांग मुलींनी सुवर्ण पदके जिंकली तर 57 वर्षीय प्रकाश सोगमने (सुवर्ण), तसेच 55 वर्षीय सुरेश बसनाईक यांनीही (कास्य) पदक विजेती कामगिरी करत हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले.
या कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीकांत पेटकर, इंग्लिश खाडी पोहणारे आशिया खंडातील दुसरे जलतरणपटू राजाराम घाग, आंतरराष्ट्रीय पॅरा ऍथलीट सत्यप्रकाश तिवारी, मनोज खैरे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू गीतांजली चौधरी तसेच विराफ मिस्त्री, फिरोज कात्रक, पवन अग्रवाल, रवींद्र कडेल आणि डॉ. जगन्नाथ हेगडे, गोविंदराव मोहिते उपस्थित होते.