
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत हिंदुस्थानकडून पराभवाचा धक्का बसताच कर्णधार स्टीव्ह स्मिथने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय जाहीर केला. पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणारा स्टीव्ह स्मिथ 2015 आणि 2023 च्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा आधारस्तंभ होता आणि तो 2027 च्या वर्ल्ड कपमध्येही ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करेल, अशी आशा होती. मात्र त्याने 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन संघात नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळावी म्हणून निवृत्तीची घोषणा केली.
हिंदुस्थानविरुद्धच्या पराभवानंतर 35 वर्षीय स्मिथने लगेचच आपल्या सहकाऱ्यांना हा माझा सामना अखेरचा एकदिवसीय सामना असल्याचे सांगितले. मात्र, तो कसोटी क्रिकेट खेळतच राहणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये स्मिथ बराच काळापासून संघाबाहेर आहे. स्टीव्ह स्मिथ म्हणाला, ‘कसोटी क्रिकेटला माझे अजूनही प्राधान्य आहे. मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये, हिवाळ्यात वेस्ट इंडिजमध्ये आणि नंतर घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहे. कसोटी क्रिकेटच्या व्यासपीठावर मला अजूनही खूप काही योगदान द्यायचे आहे.’
दोन वर्ल्ड कप जिंकणे अद्भुत कामगिरी!
‘हा एक अद्भुत प्रवास होता अन् मी त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतलाय. खूप संस्मरणीय क्षण आणि छान आठवणी आहेत. माझ्या नेतृत्वात दोन वर्ल्ड कप जिंकणे ही एक अद्भुत कामगिरी होती. 2027 च्या वर्ल्ड कपची तयारी सुरू करण्यासाठी मी जागा सोडत आहे. त्यामुळे मला निवृत्तीची हीच योग्य वेळ वाटतेय.’ – स्टीव्ह स्मिथ
170 सामन्यांत 5800 धावा
स्टीव्ह स्मिथने 2010 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने कारकीर्दीत 170 एकदिवसीय सामने खेळताना 43.28च्या सरासरीने आणि 86.96च्या स्ट्राईक रेटने 5800 धावा फटकाविल्या. 164 ही त्याची सर्वोत्तम एकदिवसीय खेळी होय. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 35 अर्धशतके आणि 12 शतके ठोकली आहेत. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्मिथ फॉर्ममध्ये नव्हता. त्याने तीन डावांमध्ये 48.50 च्या सरासरीने 97 धावा केल्या. 73 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.