तपासात असहकार्य हा कायद्याचा गैरवापरच – सर्वोच्च न्यायालय

नुसता बलात्काराचा आरोप करायचा आणि तपासात मदत करायची नाही, हा तर कायद्याचा गैरवापर आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या महिलेला चांगलेच फटकारले. अनेक पुरुषांवर बलात्काराचा आरोप केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, परंतु, पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याने या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. या महिलेचा उद्देश वेगळा असू शकतो असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याविरोधात करण्यात आलेली याचिका रद्द केली.

महिलेची याचिका रद्द करतानाच तिने केलेल्या सर्व याचिकांवर उच्च न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाला असेही आढळून आले की अशाच प्रपारचे आरोप करणाऱ्या इतर 8 लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

महिलेने 2021 मध्ये दिल्लीतील पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त आर्मी पॅप्टन राकेश वालिया यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. कोल्ड ड्रिंक मधून गुंगीचे औषध पाजून बलात्कार करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला होता. याचिकाकर्त्याने संबंधित महिलेचा आपल्याकडून पैसे उकळण्याचा डाव असल्याचा आरोप करत तिची याचिका रद्द करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने त्यासाठी नकार दिला होता.