
एखाद्या पुरुषाने महिलेला लग्नाचे वचन दिल्यानंतर ते पाळले नाही तर तो बलात्कार ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना दिला. महिलेने एका पुरुषावर लग्नाचे खोटे वचन दिल्याचा आरोप केला होता, परंतु या महिलेने 16 वर्षे सहमतीने लैंगिक संबंध ठेवले होते. त्यामुळे याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायाधीश संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची याचिका सुनावणीसाठी आली होती. लग्नाचे वचन मोडले म्हणजे महिलेवर बलात्कार केला असे मानता येणार नाही. महिलेने 16 वर्षांपर्यंत पुरुषाविरोधात कोणतीही लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली नाही यावरून आश्चर्य वाटते, असे न्यायालयाने म्हटले.
दुसऱ्या महिलेशी विवाहानंतर आरोप
आरोपीने 2006 मध्ये रात्री तक्रारदार महिलेच्या घरात घुसून तिच्याशी बळजबरीने लैंगिक संबंध बनवले, असा आरोप आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी पुरुष यांच्यात सहमतीने लैंगिक संबंध होते, असा दावा आरोपीच्या वकिलाने केला. आरोपीने दुसऱ्या महिलेशी विवाह केल्यानंतर या दोघांमधील संबंध बिघडले आणि महिलेने आरोप केले, असे म्हटले आहे.