
व्हॉट्सअॅप हॅक करून वापरकर्त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना वैद्यकीय किंवा अन्य मदतीच्या नावाखाली गंडा घालण्याचा सायबर भामट्यांचा फंडा सध्या चांगलाच तेजीत आला आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीने कसा जबरदस्त फायदा होत आहे, अशा रील्स दाखवूनसुद्धा वापरकर्त्याच्या अकाऊंटमधील पैशांवरही डल्ला मारला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सायबर गुन्हेगारीच्या विश्वात भामटे ऑनलाईन फसवणुकीचा ट्रेंड सतत बदलत असतात. वर्षभरापूर्वी प्रचलित झालेला डिजिटल अरेस्टचा प्रकार जनजागृतीमुळे काहीसा कमी झाला आहे, परंतु व्हॉट्सअॅप हॅक करून किंवा शेअर बाजारातील गुंतवणुकीचे गाजर दाखवून पैसे उकळण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचे सायबर सेलच्या पोलिसांनी सांगितले. राज्यात 2024 पर्यंत सायबर सेलकडे 2.4 लाख तक्रारी दाखल झाल्या होत्या. यात आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींची संख्या सर्वाधिक आहे.
फसवणुकीसाठी रील्सचा वापर
रील्स दाखवून सर्वात आधी युजर्सला कुठल्याशा व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्राम अकाऊंटमध्ये सहभागी करून घेतले जाते. त्यात अमुक इतके पैसे गुंतवले म्हणून आपल्याला कसा फायदा झाला, हे सांगणाऱ्या अनेक मेसेजेसचा मारा केला जातो. प्रत्यक्षात हे मेसेज धाडणारे या सगळ्या फसवेगिरीत सामील असतात. त्यांना ऑपरेट करणारे हे थायलंड, पंबोडियासारख्या देशात बसलेले असतात.
काय काळजी घ्याल
आर्थिक फसवणूक केल्यानंतर हे भामटे फसवणुकीची रक्कम अनेक बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करतात. तसेच ती रक्कम यूएसडीपी किंवा क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून आरोपी मिळवतात. त्यामुळे गुह्यांचा तपास लावणे कठीण असल्याचे सायबर सेलचे पोलीस सांगतात. त्यामुळे जर कोणत्याही व्यक्तीची आर्थिक फसवणूक झाल्यास किंवा व्हॉट्सअॅप खाते हॅक झाल्यास लगेच स्थानिक पोलीस ठाण्याचे सायबर सेल, सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.