लक्षवेधक – अपडेटेड आयटीआरसाठी 31 मार्च डेडलाइन

अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता 31 मार्च 2025 ही डेडलाइन देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त कायदा 2022 अंतर्गत करदात्यांना दोन वर्षांच्या आत आपला आयटीआर सुधारित आणि पुन्हा दाखल करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे 2022-23 आणि 2021-22 या दोन आर्थिक वर्षासाठीचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल अपडेट करायचे असेल तर करदात्यांना 31 मार्चपर्यंत भरता येणार आहे. अपडेटेड आयटीआर भरण्यासाठी नव्या तरतुदीनुसार अतिरिक्त कर करदात्यांना द्यावा लागणार आहे.

अॅपलचा आयपॅड एअर एआय फीचर्ससोबत लाँच

अॅपल कंपनीने आपला बहुचर्चित आयपॅड एअरला अखेर हिंदुस्थानी बाजारात लाँच केले. हा आयपॅड 11 आणि 13 इंच अशा दोन साईजमध्ये उपलब्ध होणार असून अॅपलने पहिल्यांदाच यामध्ये एआय फीचर्स दिले आहे. 8 कोर जीपीयू, 9 कोर जीपीयू आणि एम3 चिपमुळे नव्या आयपॅडचा परफॉर्मन्स दुप्पट झाला आहे. या मॉडलला 128 जीबी, 256 जीबी, 412 जीबी आणि 1 टीबी इंटरनल स्टोरेजसोबत आणले आहे. या मॉडलची किंमत 59 हजार 900 रुपये ते 79 हजार 900 रुपये आहे. या आयपॅडची विक्री 12 मार्चपासून सुरू केली जाणार आहे.

सोन्यावर कर्ज घेण्यामध्ये महिला आघाडीवर

2019 ते 2024 यादरम्यान कर्ज घेण्यामध्ये महिला मागे नाहीत. 2024 मध्ये महिलांनी सोने गहाण ठेवून सोन्यावर 38 टक्के कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. महिलांनी सरासरी केवळ 3 टक्के कर्ज घेतले असून पर्सनल लोन वगळता महिलांनी सोन्यावर 38 टक्के कर्ज घेतले आहे. 60 टक्के महिला कर्जदार या शहर आणि ग्रामीण भागातील आहेत.

‘सिकंदर’साठी सलमान खानने घेतले 120 कोटी

बॉलीवूडचा भाईजान ऊर्फ सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची आतापासूनच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत पहिल्यांदाच रश्मिका मंदाना दिसणार आहे. सलमान खान याने या चित्रपटासाठी 120 कोटी रुपये फी आकारल्याची चर्चा आहे. सलमान आपल्या चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपयांपर्यंत फी आकारतो.