
भाजपच्या विचाराचे जे मुळ आहे, त्यातूनच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा सातत्याने अपमानच केला आहे. हा प्रकार पूर्वीपासून आजपर्यंत चालत आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाई केली जाते मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापुरकरवर सरकार कारवाई का करत नाही? छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावे, असे आवाहन ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे.
विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रात व राज्यातील भाजप सरकार संविधानाला मानत नाही. ते धर्माच्या आधारावर भूमिका घेऊन कारवाई करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात इतिहासातील काही घटनांचा उल्लेख केला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यावर कारावई करण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यावर सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींचे समर्थन सत्ताधारी भाजप आमदार करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत अधिवेशन चालवण्याची जबाबदारी सरकारची आहे पण गोंधळ घालणाऱ्या पक्षाचे हे ‘गोंधळी सरकार’ आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातील महिलांच्या एका कार्यक्रमातील भ्रष्टाचाराला तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे नगरविकास तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जबाबदार आहेत, असे प्रतिज्ञापत्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सादर केले आहे. अशा प्रकारे मुख्य सचिवांनी माजी मुख्यमंत्र्यांविरोधात प्रतिज्ञापत्र सादर करण्याची महाराष्ट्रातील ही पहिली घटना आहे. आम्ही विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करणार आहोत, सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या प्रकरणात भाजप सरकारने अत्यंत जलद गतीने कारवाई करत त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आणि त्यांना सरकारी घरही तातडीने खाली करायला लावले. राहुल गांधी यांच्यासाठी वेगळा कायदा व माणिकराव कोकाटे यांच्यासाठी वेगळा कायदा, असे दुतोंडी सापासारखे भाजपा वागत आहे. आज शिक्षेला स्थगिती आणली आहे पण ज्या दिवशी शिक्षा ठोठावली त्यावेळीच कोकाटे यांचा राजीनामा घेऊन सदस्यत्व रद्द का केले नाही? असा प्रश्न पटोले यांनी विचारला आहे.