… अन्यथा सरकारला लाडका गुंड योजना आणावी लागेल, उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला

बहुमतातले सरकार आहे. महाराष्ट्राला गुंडमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करायचे असेल तर हीच वेळ आहे. नाहीतर लाडक्या बहिणीसारखी लाडका गुंड योजना आणावी लागेल, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. संतोष देशमुख प्रकरण व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे सरकारचीच नव्हे तर महाराष्ट्राची बदनामी होतेय, अशी टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे आज विधिमंडळ अधिवेशनासाठी विधान भवनात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रोज नवीन भानगडी बाहेर येत आहेत. मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागत आहे पण तसे करताना त्यांचे हात कुणी बांधताहेत का, हासुद्धा प्रश्न आहे. जनतेला या सगळ्याचा वीट आला आहे. त्यांना व्यथा सोडवणारे सरकार हवे आहे, एकमेकांच्या व्यथांना पांघरूण घालणारे सरकार नको आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधी पक्ष म्हणून शिवसेना जनतेच्या समस्यांविरोधात उभी आहे असेही ते म्हणाले. दरम्यान, शिवसेनेचे अनेक आमदार संपका&त असल्याचा दावा मिंधे गटाकडून केला जात आहे. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांची टर उडवली. मिंध्यांनी आधी स्वतःचे आमदार सांभाळावेत, सपने मे मिलती है गाण्याप्रमाणे शिवसेनेचे आमदार त्यांच्या स्वप्नात येताहेत, असे ते म्हणाले. याप्रसंगी शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते भास्कर जाधव, विधान परिषदेतील गटनेते अॅड. अनिल परब, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, उपनेते व आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, महेश सावंत, बाळा नर, नितीन देशमुख, पैलास पाटील उपस्थित होते.

महाराष्ट्र बदनाम होतोय

एकेकाळी चुकीचे घडले की बिहार आणि उत्तर प्रदेशचे नाव घेतले जायचे आता त्यात महाराष्ट्रही आलाय.  बिहारची हालत सुधारली आहे. यूपीत बुलडोझर आहे. महाराष्ट्र मात्र बदनाम होत आहे. ज्या पद्धतीने घटना घडताहेत तसे महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या आमच्या दैवतांबद्दल कुणी अवमानकारक बोलले तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे मत त्यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून व्यक्त केले.

राजीनामा घेतला का नाही?

मुंडे यांनी तब्येतीचे कारण सांगितले आहे. अजित पवार म्हणतात की नैतिकतेच्या मुद्दय़ावर त्यांनी राजीनामा दिला. कुणीही कुणाच्या तब्येतीबद्दल चेष्टा करू नये. पण राजीनाम्याचे नेमके कारण समजायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दोनेक महिने सरकारने कोणतीही हालचाल केली नाही. केवळ मुंडेंचाच राजीनामा नव्हे तर इतरही घटना घडताहेत त्याबाबतीतही हालचाली केल्या पाहिजेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्यावरही शरसंधान केले.