
न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या माजी सीईओ अभिमन्यू भोन याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आला, तर अन्य फरार आरोपी अरुणचलम याचा मुलगा व या गुह्यात सहभागी असलेला मनोहर याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 9 मार्चपर्यंत वाढ केली आहे.
न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींचा अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचा माजी जनरल मॅनेजर हितेश मेहता, मेहताने ज्याला अपहारातील 40 कोटी दिले तो बांधकाम व्यावसायिक धर्मेन पौन, बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भोन आणि फरार आरोपी अरुणचलमचा मुलगा मनोहर अशा चौघांना अटक केली होती. त्यापैकी मेहता आणि पौन यांची याआधीच न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती, तर अभिमन्यू भोन आणि मनोहर यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने भोन याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली, तर मनोहर याची 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली.
दरम्यान, या गुह्यातील फरार आरोपी अरुणचलम हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो कुठे लपलाय हेच पोलिसांना समजत नसल्याचे चित्र आहे.