कलिनातील अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागणार; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

कलिना विधानसभा मतदारसंघातील पालिकेच्या एच पूर्व आणि एल विभागातील नागरिकांना भेडसावणारा अपुरा पाणीपुरवठा आणि रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची रखडलेली कामे अशा विविध समस्यांबाबत शिवसेनेने मंगळवारी पालिका आयुक्त भूषण गगरानी यांची भेट घेतली. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या.

कलिनातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत शिवसेना आमदार संजय पोतनीस यांच्या सूचनेनुसार पालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्या दालनात मंगळवारी बैठक पार पडली. एच पूर्व या विभागात गेल्या 15 वर्षांपासून पालिकेकडून 110 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाढत्या विकासकामांमुळे येथे दुप्पट लोकवस्ती वाढली असून वाढत्या लोकसंख्येला हा पाणीपुरवठा अपुरा पडतोय. त्यामुळे येथील अपुऱ्या पाण्याची समस्या दूर करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय पोतनीस यांनी केली. वॉर्ड ऑफिसर आणि सीसी रोडचे अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने अनेक रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचे काम रखडले आहे. एच पूर्व आणि एल वॉर्डात अतिक्रमण न हटवताच कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. याशिवाय एल वॉर्डात वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असून हॉटेल व्यावसायिकांनी बेकायदेशीर बांधकाम केल्यामुळे आग विझवण्यात अडचणी येतात याकडे आमदार  पोतनीस यांनी लक्ष वेधले. या समस्यांचे अवलोकन करून योग्य कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. मुंबई विद्यापीठ, पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्या वादामुळे गेली 13 वर्षे राजेंद्र कांबळे मार्गाचे काम रखडले आहे. हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

या बैठकीला पालिका उपायुक्त चंद्रशेखर चोरे, विश्वास मोटे, राजेंद्र क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, धनाजी हेर्लेकर, विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता सुनील राठोड, शाखाप्रमुख गणेश सावंत, विलास मोरे, जितेंद्र अणेराव, सुधीर भोसले, राजन खैरनार व शैलेश डाळ आदी उपस्थित होते.

कलिना येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलच्या बाजूला पालिकेचा मैदानासाठी आरक्षित मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर पालिकेने मुलांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार पोतनीस यांनी केली. त्यावर यासंदर्भात आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

कुर्ला येथील हलाव पुलावरून मेट्रो जाणार आहे. या पुलाची उंची कमी असल्याने उंच गणेशमूर्ती जाऊ शकत नाही. पालिकेने स्थानिकांना पर्यायी रस्ता सुचवला आहे. पर्यायी रस्त्यावरील बाधित झोपडीधारकांना जवळपासच घरे दिली तर ते शिफ्टिंगसाठी मान्य करतील, असे पोतनीस यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.