इंजिनीअरिंग, फार्मसी, विधी, मेडिकल परीक्षेला निर्धास्तपणे सामोरे जा, युवासेनेकडून 29 मार्चला मॉकटेस्ट

इंजिनीअरिंग, फार्मसी, विधी, मेडिकलच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा यासाठी सीईटी, नीट परीक्षेची विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यासाठी शिवसेना, युवासेनेकडून मॉकटेस्ट घेण्यात येणार आहे. 29 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान मॉकटेस्ट होणार असून या मॉकटेस्टमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्रातून दरवर्षी असंख्य विद्यार्थी इंजिनीअरिंग, फार्मसी, विधी व इतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना सीईटी, नीट परीक्षा द्यावी लागते. देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना कठीण जात असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण होते. ही भीती दूर सारण्यासाठी या वर्षीसुद्धा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार मॉकटेस्ट घेण्यात येणार आहे. या मॉकटेस्टसाठी विद्यार्थ्यांना नाव नोंदवावे लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी https://yuvasenacet.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन शिवसेना, युवासेनेकडून करण्यात आले आहे.