
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला अंधेरी पूनम नगर येथील पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे. वारंवार निविदा काढूनदेखील विकासकांनी पाठ फिरवल्यामुळे अखेर म्हाडानेच आता या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचे नियोजन केले आहे. लवकरच यासंदर्भातला प्रस्ताव म्हाडा सरकारला पाठवणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जोगेश्वरीच्या पूनम नगर येथील पीएमजीपी वसाहत 1990-92 मध्ये उभारण्यात आली आहे. 27 हजार 625 चौरस मीटर भूखंडावर पसरलेल्या या वसाहतीत चार मजली 17 इमारती असून त्यात 942 निवासी तर 42 अनिवासी गाळे आहेत. पीएमजीपी वसाहतीमधील या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता ती सी 1 गटात म्हणजे इमारती धोकादायक असून वास्तव्यास अयोग्य आहेत. या वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी संबंधित गृहनिर्माण सोसायटीने एका विकासकाची नेमणूक केली होती. मात्र गेल्या दहा वर्षांत विकासकाने पुनर्विकास केला नाही. त्यामुळे या विकासकाची नेमणूक रद्द करण्यात आली. त्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट पद्धतीने विकासकाची नेमणूक करण्यासाठी निविदा काढण्यात आली. वारंवार निविदा काढूनदेखील विकासकांनी त्याला प्रतिसाद न दिल्याने आता म्हाडाच या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
म्हाडा बांधणार 17 मजली इमारती
राज्य सरकारकडून हिरवा पंदील मिळाल्यास म्हाडा या ठिकाणी 17 मजली इमारती बांधण्याच्या तयारीत आहे. सध्या येथील रहिवासी वर्षानुवर्षे 180 चौरस फुटांच्या घरात राहत असून त्यांना 430 ते 440 चौरस फुटांची घरे देण्याची म्हाडाची तयारी आहे. रहिवाशांना भाडे किंवा संक्रमण शिबिराचा पर्याय देऊन घरे रिक्त केली जातील. त्यानंतर पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होईल. या पुनर्विकासातून म्हाडालादेखील काही प्रमाणात घरे लॉटरीसाठी उपलब्ध होतील.