
अभिनेता सैफ अली खानवर हल्लाप्रकरणी महिन्याअखेर वांद्रे पोलीस न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत. पोलिसांकडे सकारात्मक अहवाल आणि पुरावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. जानेवारीत अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी चाकूहल्ला झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. वांद्रे पोलिसांनी तपासासाठी अनेक पथके तयार केली. अखेर पोलिसांनी ठाणे येथून बांगलादेशी हल्लेखोर मोहम्मद शरीफुल इस्लामला ताब्यात घेऊन अटक केली होती. ओळखपरेडदरम्यान अभिनेत्याच्या कर्मचाऱयांनी आरोपीला ओळखले होते. तसेच इमारतीच्या डक्टमध्ये त्याच्या बोटांचे ठसेदेखील जुळल्याचे सूत्रांनी सांगितले. चाकूवर सापडलेले रक्ताचे डाग आणि अभिनेत्याच्या रक्ताच्या नमुन्याशी जुळले आहे. पोलिसांनी 25 हून अधिक जणांचा जबाब नोंदवला आहे. त्यात अभिनेत्री करिना कपूरचादेखील समावेश आहे. शरीफुलचा एक नातेवाईकाचादेखील पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. शरीफुल इस्लामने पश्चिम बंगाल येथे एका महिलेचा फोन चोरला होता. पोलीस सध्या आरोपपत्र अंतिम करत आहेत. येत्या महिन्याअखेर आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे.