
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील पहिली सेमी फायनल दुबईमध्ये हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळली जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 264 धावांमध्येच बाद झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला फायनलमध्ये पोहचण्यासाठी 265 धावांची गरज आहे. टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी कंगारुंच्या पायात परफेक्ट बेड्या ठोकल्या त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आला नाही.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत टीम इंडियाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. परंतु ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी करण्याच्या निर्णयावर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाणी फेरले. टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबुत धाडला. यामध्ये टीम इंडियासाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेल्या ट्रेव्हीस हेडचा (39 धावा) सुद्धा समावेश आहे. वरुन चक्रवर्तीने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधर स्टीव्ह स्मिथचा (73 धावा) मोहम्मद शमीने त्रिफळा उडवला. तसेच मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या अॅलेक्स कॅरीला (61 धावा) श्रेयस अय्यरने धावबाद केले. यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 264 धावांमध्ये तंबुत परतला.
टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर रविंद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2-2 आणि अक्षर पटेल व हार्दिक पंड्याने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.