शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, उद्धव ठाकरे यांच्याकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस

विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. याबाबतच पात्र आज शिवसेनेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलं. याबाबतच बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ”आज शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासह महाविकास आघडी म्हणून पुढील वाटचाल आम्ही एकत्र करणार आहोत. इतरही ज्या गोष्टी आहे, त्याबद्दल आमची चर्चा सुरु आहे. यापुढे सुद्धा चर्चा करून आम्ही एकत्र निर्णय घेत राहू.”

उद्धव ठाकरे म्हणाले की, ”आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी नेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची मागणी केली. आम्हाला खात्री आहे की, लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल. तसेच अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी याचा निर्णय होईल”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, ”अर्थसंकल्प सादर होताना विरोधी पक्षनेता असला पाहिजे, जो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल. आम्ही अपेक्षा करत आहोत की, मुख्यमंत्री ज्या पद्धतीने स्वच्छ कारभार करत आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड काढली गेली. त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला दयामाया, क्षमा दाखवली जाणार नाही. त्याच पद्धतीने याच नीतीला जागून याही बाबतीत लवकरात लवकर निर्णय होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”