Santosh Deshmukh Case – राजीनामा ही आमची मागणी नव्हती, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे; मुंडेंच्या राजीनाम्यावर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आज अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देखमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजीनामा ही आमची मागणी नव्हती. आम्हाला न्याय मिळावा, असे धनंजय देशमुख म्हणाले.

आमची पहिली आणि शेवटची मागणी हीच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या भावाला एका लोकप्रतिनिधीला ज्या प्रकारे संपवलं गेलं ते जे आरोपी आणि क्रूरकर्मी लोक आहेत, हे अमानवीय कृत्या ज्यांनी केलं त्या लोकांना फाशी झाली पाहिजे. आणि मुख्यमंत्री साहेबांना जो शब्द दिलेला आहे की, शेवटचा माणूस फासावर लटकेपर्यंत कोणालाही सोडलं जाणार नाही. न्यायाच्या प्रतिक्षेत तोपर्यंत आम्ही असणार आहोत. अशी आमची भूमिका होती आणि तीच कायम राहणार आहे. यात पारदर्शक तपास व्हावा, कुणाचा राजकीय दबाव नसावा आणि आम्हाला न्याय मिळावा. राजीनामा ही आमची मागणी नव्हती, असे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.

झालेल्या अडीच महिन्यातलं जे नुकसान आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. ज्या वेळेस भावाची हत्या झाली, तुम्ही यंत्रणा राबवल्या. त्या यंत्रणेवर दबाव आणला. पहिल्या पोलीस यंत्रणेनं काय-काय चुकीची कामं केलेली आहेत. त्यावेळेस तुम्हाला कसं काही समजलं नाही. 6 तारखेला अ‍ॅट्रॉसिटी घेतली असती तर 9 तारखेला खून झाला नसता. तसंच तुम्ही भावाची हत्या झाल्यावर जी गोष्ट करायला हवी होती ती आज केली. मध्यंतरीच्या काळामधलं जे नुकसान आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला.

चुकीच्या मार्गाने, काळ धन जमवलेलं आहे. त्याच्यातून लैंगिक शोषण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. अपहरणं, खून झालेले आहेत. खंडणी खूप मोठ्या प्रमाणात जमा केलेली आहे. यातूनच या सर्व गोष्टी घडल्या आहेत. पैसा हा सर्वस्वी आहे, पद काहीही करू शकतो, या सगळ्या भूमिकेतून यांनी ही सगळी गुन्हेगारी वाढवली आहे. हे सर्वश्रृत आहे. परंतु अशी घटना घडली की एका निष्पाप माणसला यांनी चुकीच्या पद्धतीने संपवलं. मृत्युनंतरही त्याच्या मृतदेहाची विटंबना केली. या क्रूरकर्मी लोकांनी हे सगळं केल्यामुळे उठाव झाला, असे धनंजय देशमुख म्हणाले.

आरोपींचे समर्थक अजूनही फिरताहेत. आम्ही आरोपींचे समर्थक आहेत हे छातीठोकपणे सांगत आहेत. आरोपींचं मनोबल वाढवताहेत. आरोपी सुनावणीलाला आल्यानंतर बाहेर भीतीयुक्त वातावरण तयार करण्यासाठी ग्रुपने थांबताहेबत. हे सगळे सीसीटीव्हीतून आणि पुरावे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले आहेत, असेही धनंजय देशमुख यांनी सांगितले.