
फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला बसू न देण्याचा कारनामा उलव्यातील एसएनजी इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने केला आहे. परीक्षा सुरू असताना या विद्यार्थ्यांना पेपर न देता बसवून ठेवण्यात आले. आपल्या मुलांना आणण्यासाठी पालक शाळेत गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला आणि त्यांना धक्काच बसला. कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा व्यवस्थापनाने लहान मुलांवर केलेल्या या कारवाईमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
उलवे येथील सेक्टर ५ मध्ये एसएनजी इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सध्या प्राथमिक विभागाची वार्षिक परीक्षा सध्या सुरू आहेत. पहिलीपासून ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी आज नेहमीप्रमाणे परीक्षेसाठी शाळेत आले. मात्र प्रत्यक्षात पेपर लिहिण्याची वेळ झाल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने ज्या विद्यार्थ्यांची फी बाकी आहे, त्यांना वर्गात मागील बाकावर बसवण्यात आले. पेपरच्या कालावधीत हे विद्यार्थी वर्गाबाहेर बसून होते. परीक्षा संपल्यानंतर पालक नेहमीप्रमाणे आपल्या मुलांना शाळेत आणण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला आणि त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी शाळा प्रशासनाच्या या मुजोरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
■ या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुमारे 60 हजार रुपये वार्षिक फी भरावी लागते. या फीपैकी काही पालकांनी पहिल्या टप्प्यात 40 हजार रुपये फी भरली होती. उरलेल्या 20 हजारांची फी भरली नाही म्हणून त्यांच्या मुलांना पेपर लिहू दिला नाही.
■ फी रखडलेल्या मुलांवर अशा पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे, अशी कोणतीच कल्पना पालकांना देण्यात आली नव्हती. साधा एसएमएसही शाळेने पाठवला नव्हता, यावर अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
■ परीक्षेच्या कालावधीत अशा पद्धतीने शिक्षा केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बालमनावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थापनाने ही शिक्षा करताना थोडा विचार करणे आवश्यक होते. अशीही प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे.
शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार
आर्थिक अडचणीमुळे काही पालकांना वेळेवर फी भरता येत नाही शाळा अशा पालकांकडून लेट फी वसूल करीत आहे. फी थकली म्हणून मुलांचे शिक्षण थांबवता येत नाही. तरीही एसएनजी इंटरनॅशनल या शाळेच्या व्यवस्थापनाने मुलांच्या बालवयावर परिणाम करणारी ही शिक्षा दिली आहे. त्यामुळे शाळेच्या विरोधात शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहितीही काही पालकांनी दिली.