Santosh Deshmukh संपूर्ण सरकारच बरखास्त झाले पाहिजे! आदित्य ठाकरे आक्रमक

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर बोलताना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

”काल मुख्यमंत्री एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्र्याकडे गेले. तिथे बैठक झाली. मुख्यमंत्री बोलवून नाही घेऊ शकत. राजीनामा मागवून घ्यायला हवा होता. हकालपट्टी करायला हवी होती. बीडमध्ये हत्या होत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून संपूर्ण सरकार बरखास्त व्हायला पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी परिस्थिती आलीय”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”गेल्या काही दिवसात राजकारण एवढं घाणेरडं होत चाललं आहे. सरपंचांना सांगतात तुम्हाला फंड देणार नाही. आज महाराष्ट्रात एक सरपंच कुणाचा भाऊ, वडील असेल. काही चिरीमिरी लोकं धमक्या देतात सरपंचांना फंड देणार नाही. पण आधी सरपंचांना न्याय द्या. भाजपची एक टॅगलाईन होती की महाराष्ट्र थांबणार नाही. हा महाराष्ट्र ज्यात गुन्हेगारी सुरू आहे तो थांबलाच पाहिजे. हे थांबवलाच गेलंच पाहिजे. फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन चालणार नाही. सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे. हे संपूर्ण सरकार बरखास्त झालं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सर्व पाहत आहेत. लहान मुलींवर अत्याचार, महिलांवर बलात्कार, बसमध्ये रेप होतो आणि गृहराज्यमंत्री म्हणतात की बलात्कार शांततेत पार पडलं म्हणून कारवाई करू शकत नाही”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

”संतोष देशमुख प्रकरणी साधारणपणे डिसेंबरपासून हे प्रकरण सुरू आहे. नागपूरमध्ये मविआच्या आमदारांनी पारदर्शक चौकशीसासठी आका म्हणून ज्यांचं नाव येतंय त्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. फक्त आम्हीच नाही तर भाजपचे धस नमितताई देखील हिच मागणी करत होते. हे सगळं झाल्यानंतर मुख्यमंत्री न्याय देतील असं वाटलं होतं. पण मुख्यमंत्र्याचे हात कशात बांधले होते? युतीधर्मात, मैत्रीत बांधले होते कशात बांधले होते तर आम्हाला माहित नाही. डिसेंबर, जानेवारी, फेब्रवारी गेला पण काहीही झालेले नाही. काल फोटो व्हिडीओ आले. ते पाहताना मन हलून गेलं. डोळ्यात पाणी होतं. सगळेच हादरून गेले. अजुनही विचार करू शकत नाही त्या परिवाराचं काय होत असेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.