Santosh Deshmukh गृहमंत्रालयाला सर्व माहित होते, मग एवढे दिवस गप्प कसे राहिले? धनंजय देशमुख यांचा संतप्त सवाल

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निर्घृणपणे हत्या करण्यात आली ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्या क्रूर हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान हे फोटो आधीच गृहमंत्रालयाकडे होते, तरिही गृहमंत्रालय एवढे दिवस गप्प कसे राहिले, असा संतप्त सवाल संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे.

धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याच्या गृहमंत्रालयाला फटकारले आहे. ”सगळ्यांना सगळं माहिती होते. हे फोटो आधीच गृहमंत्रालयाकडे गेले होते. यांना मन नाही हृदय नाही. यांना माहित होतं कोण कोण होतं. मग एवढे दिवस गप्प का बसलात? असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला आहे.

” एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला त्याचं तुम्हाला दु:ख कधीच झालं नाही. तुमच्या भविष्याचं तुम्हाला पडलं आहे. खालच्या स्तराची विचारसरणी घेऊन चालले आहेत हे. यांना नियती माफ करणार नाही. नियती यांचा काळा बाजार उठवणार, अशी टीका देशमुख यांनी केली.

आधीच्या पोलीस अधिक्षकांच्या मोबाईलचा सीडीआर काढा

माझ्या भावाने शेवटच्या क्षणी माझीा वाट पाहिली असेल. निरागस डोळ्यांनी तो मला शोधत असेल. कुठुनतरी येऊन माझा भाऊ मला मला वाचवेल असं वाटलं असेल त्याला. त्यावेळी सर्व मोबाईलचे टॉवर लोकेशन पोलिसांकडे असताना देखील त्यांनी त्यांना पकडायचा प्रयत्न केला नाही. जुन्या पोलीस अधिक्षकांच्या फोनचा सीडीआर रिपोर्ट काढला तर त्यांना हे प्रकरण दाबण्यासाठी कुणाकुणाचे फोन गेले, कुण्या राजकीय व्यक्तीने त्यासाठी दबाव आणला ते समोर येईल. सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. एक ते सात आरोपी कुणाच्या जीवावर हे सगळं करत होते. माणूसकी नैतिकता यांच्यात नाही, असे देशमुख म्हणाले.