स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेकडून आणखी गुन्हे उघड होण्याचा संशय

स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेने अशा प्रकारचे विनयभंग, अत्याचाराचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार तपासाला गती देण्यात आली आहे. दरम्यान, महिलांवर धमकावून अत्याचार, विनयभंगासह इतर काही तक्रार असल्यास संबंधितांनी पुणे गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. संबंधित प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

गाडेविरुद्ध तांत्रिक, वैद्यकीय पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने ताब्यात घेतले आहेत. त्याची वैद्यकीय, लैंगिक क्षमता तपासणी केली आहे. दरम्यान, गावी गेल्यानंतर आरोपी गाडेने त्याचा मोबाइल फेकून दिला आहे. त्याचा मोबाइल जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या मोबाइल संभाषणाचा तांत्रिक तपास करण्यात येत आहे.

पीडितेचा जबाब नोंदविला…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा जबाब सोमवारी न्यायाधीशांसमोर नोंदवून घेण्यात आला. संबंधित जबाब गोपनीय असून, पीडित तरुणीचा जबाब खटल्यात महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, जबाबातून आणखी काही महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

माझा विश्वास फक्त तुमच्यावर, मला वाचवा पीडित तरुणीचे आर्जव

स्वारगेट एसटी स्थानकामध्ये अत्याचार झालेल्या पीडित तरुणीने आपल्या मित्राच्या माध्यमातून शिवसेनेचे राज्य संघटक वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मोरे यांनी त्या पीडित तरुणीची भेट घेतली. मला वाचवा, मी फक्त तुमच्यावरती विश्वास ठेवू शकते. खूप जण मला काही बाही विचारत आहेत. मी सगळ्य़ांना सांगून थकले असल्याचे या पिडितेने आपल्याशी बोलताना सांगितले, अशी माहिती स्वतः मोरे यांनी दिली. पीडितेने याबाबत आपल्याशी बोलताना सांगितले की, त्या आरोपीने धमकावून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. कोलकाता रेप केसमध्ये ज्या पद्धतीने तरुणीला मारून टाकले तो प्रसंग मला आठवला. माझ्या मागे माझं कुटुंब असल्याने मी त्या सगळय़ा गोष्टी सहन केल्याचे तिने सांगितले.

सत्य समोर आल्यावर फाशी दिली तरी मान्य; दत्ता गाडे याच्या भावाचे मत

स्वारगेट प्रकरणानंतर संपूर्ण गाव आमच्या कुटुंबीयांना हीन वागणूक देत आहे. अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, पोलीस तपास करत आहेत. सर्व माध्यमे नाण्याची एकच बाजू मांडत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य सर्वांपुढे आणले पाहिजे. आमचा न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास आहे. जर गुन्हा सिद्ध झाला आणि न्यायालयाने दत्ता गाडे याला फाशीची शिक्षा सुनावली तरी ती आम्हाला मान्य असेल, असे आरोपी दत्ता गाडे याच्या भावाने पत्रकार परिषदेत सांगितले.

आम्ही बक्षिसाला हपापलेलो नाही! गुनाटच्या ग्रामस्थांची प्रतिक्रिया

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला आम्ही पोलिसांना पकडून दिले ते केवळ गावची बदनामी टाळण्यासाठी, बक्षिसासाठी नव्हे. आम्ही बक्षिसाला हपापलेलो नाही, असे गुनाट गावातील प्रमुख पदाधिकाऱयांसह ग्रामस्थांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.

आरोपी गाडे याला पकडण्याच्या शोध मोहिमेत ग्ऱामस्थांनी पोलिसांना मदत केली. शोध मोहिमेत सहभागी झालेले तरुण व ग्रामस्थ यांनी आरोपीला पकडून देऊन बक्षीस मिळावे म्हणून काम केले नाही, असेही ग्रामस्थांनी सांगितले.

आरोपीला पकडून दिल्यामुळे गावात कोणताही क्षेयवाद नाही किंवा कोणालाही बक्षिसाची आवश्यकता नाही, असेही पदाधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
पुण्याच्या पोलीस कमिशनरांनी गावकऱयांना बक्षीस दिले तर ते सर्वानुमते स्वीकारले जाईल व गावामध्ये समाजकार्यासाठी वापरले जाईल, असेही ते म्हणाले.