
परभणीत डिसेंबर महिन्यात संविधानाच्या प्रतिकृतीची तोडपह्ड करून विटंबना केल्या प्रकरणी निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. लोकनेते विजय वाकोडे यांचासुद्धा दडपशाहीमुळे मानसिक धक्क्याने हृदयविकाराने मृत्यू झाला. परभणी हिंसाचार प्रकरणात निरपराध सूर्यवंशी व वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी संघटना आणि सर्व पक्षीय संविधान प्रेमी नागरिकांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत आझाद मैदान येथे जोरदार आंदोलन केले. मंत्रालयाला घेरावा घालण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मिळावा यासाठी सकाळपासूनच मुंबईच्या आझाद मैदानावर निळे ध्वज, पंचशील ध्वज घेऊन तसेच हातामध्ये फलक घेऊन ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ असा जयघोष करत मोठय़ा प्रमाणात भीमसैनिक दाखल झाले. या आंदोलनाचे समन्वयक डॉ. सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्यासह भिक्खू संघ यांची उपस्थिती होती. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, शिवसेनेचे परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांचीही उपस्थिती या वेळी होती.
प्रमुख मागण्या
सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून न्यायालयीन चौकशी करा.
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करा.
सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपये व कुटुंबातील 1 व्यक्तीला शासकीय नोकरी द्या.
पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान निरपराध भीमसैनिकांवरील दाखल केलेले गंभीर गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत.
पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या भीमसैनिकांना आर्थिक मदत द्यावी.
परभणी हिंसाचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालविण्यात यावा.
संविधान शिल्प प्रतिकृती विटंबना करण्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.