पोलिसांनी भाषण स्वातंत्र्याचा अधिकार समजून घ्यावा; सर्वेच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी सादर केलेली ए खून के प्यासे, बात सुनो ही कविता प्रत्यक्षात अहिंसेचा संदेश देणारी असून त्यांच्यावर आरोप दाखल करणाऱ्या पोलिसांनी आधी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार समजून घ्यावा, असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.

कथित भावना भडकावणारे गीत सादर केल्याच्या आरोपाखाली गुजरात पोलिसांनी प्रतापगढी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो रद्द करण्याकरिता प्रतापगढी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता न्यायालयाने पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.

देशात राज्यघटना लागू झाल्याच्या 75 वर्षानंतरही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार काय असतो हे पोलिसांना समजलेले नाही. पोलिसांना राज्यघटनेतील कलम वाचावे आणि समजून घ्यावे. त्यामुळे त्यांनी आधी तो अधिकार समजून घ्यावा, असे सुनावत प्रतापगढी यांच्या याचिकेवरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला आहे.

सुप्रीम कोर्ट म्हणते…
इम्रान प्रतापगढी यांनी सादर केलेली ए खून के प्यासे बात सुनो ही कविता प्रत्यक्षात अहिंसेचा संदेश देते. या कवितेचा धर्माशी, राष्ट्रविरोधाशी संबंध नाही.

प्रतापगढी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करताना पोलिसांनी अजिबात संवेदनशीलता दाखवलेली नाही.
कविता पोलिसांनीही वाचावी. न्यायाच्या लढाईत जर अन्यायही झाला तर त्याचे उत्तर प्रेमाने देऊ, असा या कवितेचा भावार्थ आहे.