
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आज हातामध्ये बेडय़ा घालून विधान भवनात पोहोचले. आव्हाड यांना त्या अवस्थेत पाहून प्रसारमाध्यमांनी त्यांना गराडा घातला. बेडय़ा घालून येण्याचे कारण त्यांना विचारले गेले. त्यावर आवाज दाबला जातोय असे उत्तर त्यांनी दिले.
आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जातोय. कार्यकर्ते आपली मते व्यक्त करतात तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांचा आवाज दाबला जात आहे. व्यक्त होण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो मूलभूत अधिकारही दाबला जातोय म्हणून आपण बेडय़ा घालून आलोय, असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला.
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या व्हिसाबाबतच्या धोरणांमुळे अनेक हिंदुस्थानींची घरे उद्ध्वस्त होणार आहेत. अमेरिकेने हिंदुस्थानींच्या हातापायात बेडय़ा घालून त्यांना परत पाठवले. तो अपमान हिंदुस्थानला हिणवणारा आहे. आपली मुले अमेरिकेत जाऊन मोठी होतील अशा स्वप्नांचा चुराडा होत आहे. हिंदुस्थानींच्या हातापायांतील बेडय़ांबाबत आपण बोलत नसू तर ते राष्ट्रासाठी घातक आहे, असे आव्हाड म्हणाले.