
औरंगजेबाला आपण क्रूर शासक मानत नाही, तो क्रूर नव्हता. उलट त्याने अनेक हिंदू मंदिरे उभारली, अशी दर्पोक्ती समाजवादी पार्टीचे आमदार आबू आझमी यांनी आज केली. औरंगजेब एक महान राजा होता आणि त्याच्या काळात हिंदुस्थान सोने की चिडिया होती, त्याची राजवट पाहूनच इंग्रज हिंदुस्थानात आले होते, असेही आझमी यांनी म्हटले. त्याबद्दल प्रचंड संताप निर्माण झाला असून आझमी यांना तातडीने अटक करावी अशा मागणीने जोर धरला आहे.
प्रत्येक अधिवेशनात काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करून आबू आझमी चर्चेत राहतात. आजही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वरील वक्तव्य केले. औरंगजेब न्यायप्रेमी सम्राट होता. वाराणसीमध्ये एका सरदाराने पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले होते, अशी औरंगजेबाची प्रशंसा करताना आझमी यांनी, छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर छळाबद्दलच्या प्रश्नाला मात्र उत्तर देणे टाळले. आपल्याला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला.
आझमींना अटक करा – आदित्य ठाकरे
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असे ते म्हणाले. आझमींचे हे वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक करा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.