
जादुई फिरकीने मुंबई क्रिकेट गाजवणाऱया पद्माकर उर्फ पॅडी शिवलकर यांची आयुष्याची खेळी वयाच्या 84 व्या वर्षी संपली. गेले काही महिने ते महिने आजारीच होते. कपाळी हिंदुस्थानी कसोटीपटूचा टीळा लागावा म्हणून त्यांनी वयाच्या 48 व्या वयापर्यंत आपल्या फिरकीची किमया मुंबई संघासाठी दाखवली, पण क्षमता असूनही या शापित गंधर्वाला हिंदुस्थानसाठी कसोटी सामना खेळण्याची संधी मिळू शकली नव्हती. मुंबईसाठी 589 विकेट टिपणारा हा महान
गोलंदाज शेवटपर्यंत रणजीपटूच राहिला.
वयाच्या 22 व्या वर्षी मुंबई क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या शिवलकर यांनी तब्बल 20 वर्षे मुंबईच्या फिरकीची धुरा वाहिली. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेकदा अद्भुत गोलंदाजी करत हिंदुस्थानच्या निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधले होते. 1960 आणि 1970 चे दशक हे पॅडी यांच्या फिरकीचेच होते. पण संघात बिशनसिंग बेदी यांच्या डावखुऱया फिरकीचे वर्चस्व असल्यामुळे शिवलकर यांच्यासाठी हिंदुस्थानी संघाचे द्वार शेवटपर्यंत उघडू शकले नाही. 124 प्रथम श्रेणी सामन्यात 589 विकेट टिपले.
मुंबईचा चॅम्पियन फिरकीवीर
पद्माकर शिवलकर मुंबई क्रिकेटसाठी तब्बल 25 वर्षे खेळले, पण ते खरे चॅम्पियन डावखुरे फिरकीवीर होते. त्यांनी आपल्या फिरकीच्या जादुई माऱयाच्या जोरावर मुंबईला 1965-66 ते 1976-77 या कालखंडात सलग दहा वेळा रणजी जेतेपद मिळवून दिले. केवळ एका स्पर्धेत ते संघात नव्हते. त्यानंतर 1980-81 साली मुंबई चॅम्पियन झाला तेव्हा ते संघात होते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी मुंबई संघात पुनरागमन करून दाखवले. 1987-88 च्या मोसमात ते दोन सामने खेळले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 589 विकेट टिपणाऱया शिवलकरांनी 361 विकेट रणजी सामन्यात टिपल्या आहेत. मुंबईच्या कोणत्याही गोलंदाजाने आजवर इतक्या विकेट टिपलेल्या नाहीत. 1972-73 साली तामीळनाडूविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी अवघ्या 16 धावांत 8 विकेट टिपण्याची करामत करून दाखवली होती.
किमान एक तरी संधी द्या
शिवलकर यांना आपल्या दीर्घ क्रिकेट कारकीर्दीत एकाच गोष्टीची खंत राहिली. आपल्यावर आयुष्यात खूप अन्याय झाल्याची भावना त्यांना सलत राहिली. केवळ एक कसोटी सामना तरी खेळायला मिळायला हवा होता, असे ते नेहमीच म्हणत होते. जशी संधी धीरज परसानाला मिळाली तशी संधी मलाही मिळाली असती तरी माझे आयुष्य पावन झाले असते. मग मला चार षटकेच गोलंदाजी टाकायची संधी मिळाली असती तरी मला चालले असते. किमान त्या चार षटकांत माझ्या फिरकीची जादू क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली असती. माझे हात त्या कसोटीने आभाळाला टेकल्याचे समाधान मला मिळाले असते, असे दुःख शिवलकरांनी वेळोवेळी मांडले. हिंदुस्थानी कसोटी संघाची ‘कॅप’ मला मिळाली नाही, किंबहुना मला ती मिळू दिली नाही, ही भळभळणारी जखम, त्याची असह्य वेदना मी एकटय़ाने भोगल्याचे शिवलकर यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.
- पॅडी शिवलकर यांना आपल्या दीर्घ क्रिकेट कारकीर्दीत एकाच गोष्टीची खंत राहिली. आपल्यावर आयुष्यात खूप अन्याय झाल्याची भावना त्यांना सलत राहिली. केवळ एक कसोटी सामना तरी खेळायला मिळायला हवा होता, असे ते नेहमीच म्हणत होते.