धनंजय मुंडेंची शिरजोरी… म्हणाले, करुणा शर्माला पोटगी देणार नाही

घरगुती हिंसाचारप्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलेल्या कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या विरोधातील आरोप फेटाळून लावले आहेत. आपण निर्दोष असून पत्नी करुणा हिला कोणत्याही प्रकारची पोटगी देणार नाही, असा दावा करत धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कौटुंबिक न्यायालयाचा निकाल रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली असून मुंडेंच्या याचिकेवर न्यायालयात 21 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

गेल्या महिन्यात वांद्रय़ाच्या कौटुंबिक न्यायालयाने कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना दणका देत घरगुती हिंसाचार प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी ठरवले होते तसेच पत्नी करुणा यांनी केलेले आरोप सकृतदर्शनी मान्य करत मुंडे यांना पत्नीला 1 लाख 25 हजारांची पोटगी व मुलगी शिवानी हिला 75 हजार रुपये दरमहा देण्याचे आदेश दिले होते. मात्र धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत पत्नी व मुलीला दरमहा पोटगी देण्यास नकार दिला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाविरोधात मुंडे यांनी सत्र न्यायालयात अॅड. सायली सावंत यांच्या मार्फत याचिका दाखल केली असून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर खटला निकाली निघत नाही तोपर्यंत पोटगी देण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी मुंडे यांनी याचिकेतून केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांच्या समोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी प्रतिवाद्यांकडून बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागण्यात आला. न्यायालयाने याची दखल घेत सुनावणी 21 मार्चपर्यंत तहकूब केली.

मुंडे म्हणतात आदेशच चुकीचा

  • धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशावर शंका उपस्थित केली आहे. कौटुंबिक न्यायालयाने सारासार विचार न करताच पोटगी देण्याचा आदेश दिला.
  • कौटुंबिक न्यायालयाचा आदेश मनमानीकारक आणि चुकीचा आहे.
  • कौटुंबिक न्यायालयाचा आदेश सत्र न्यायालयाने रद्द करावा.