
हिंदुस्थानने बाद फेरीत असो किंवा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा काटा काढलाय तेव्हा जगज्जेतेपदाचा मुकुट मिरवलाय. पण 2011नंतर हिंदुस्थानला तो पराक्रम करता आलेला नाहीय. हा इतिहास बदलण्यासाठी आणि ध्वज विजयाचा उंच धरण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. चॅम्पियन्स ट्रॉफीत चॅम्पियन्सचा मान मिळवण्यापूर्वी हिंदुस्थानला उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाला हरवावे लागणार आहे. मंगळवारी तो इतिहास रचण्यासाठी आणि गेल्या पराभवांचा बदला घेण्याचे ध्येय डोळ्यांपुढे ठेवलेय.
हिंदुस्थानसाठी दुबईचे स्टेडियम चांगलेच फळलेय, फळतेय. साखळीतील तिन्ही लढतींत हिंदुस्थानने विजय साजरे करत हॅटट्रिक केली. स्पर्धा चॅम्पियन्सची असली तरी या स्पर्धेत सध्या हिंदुस्थानच चॅम्पियन्सच्या भूमिकेत शिरला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत आमचा संघ कमकुवत नसल्याचे दाखवून दिले होते. त्यानंतर उर्वरित दोन्ही लढतीत खेळ पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर आता थेट ते हिंदुस्थानशी भिडणार आहेत. सलग तीन विजयांमुळे हिंदुस्थानचे मनोधैर्य उंचावले असले तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाद फेरीतील लढतींचा वेगळा इतिहास आहे. उभय संघांतील लढतींमध्ये नेहमीच कांटे की टक्कर होते आणि त्यात ऑस्ट्रेलिया आपला अलगद काटा काढत जगज्जेता होतो.
2015च्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्येही तसेच झाले. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत हिंदुस्थानला नमवले आणि जगज्जेते होण्याचा मान मिळवला. मग 2023मध्येही त्याची पुनरावृत्ती झाली आणि तेच जगज्जेते झाले. पण त्याआधी 2011च्या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा पाडाव केला आणि त्यानंतर सहज जगज्जेतेपदाला गवसणी घातली होती. आत्ताच त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे ध्येय हिंदुस्थानी संघासमोर आहे. जेव्हा हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियावर बाद फेरीत मात केलीय, जगज्जेतेपदाचा चषक हिंदुस्थाननेच उंचावलाय. मग ते 2011 असो किंवा टी-20 वर्ल्ड कपचे 2007 आणि 2024. ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर हिंदुस्थानला कोणी रोखू शकलेला नाहीय.
हिंदुस्थानचे लक्ष शर्मा-कोहलीवर
हिंदुस्थानी फलंदाजीचा कणा असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीने या स्पर्धेत आपली फलंदाजी दाखवून दिली असली तरी ते एकेक सामन्यातच खेळले आहेत. विराटच्या बॅटीतून शतक निघाले असले तरी रोहितला आपल्या लौकिकानुसार झंझावाती शतकी खेळ अद्याप करता आलेला नाही. मात्र शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या फलंदाजीचा फॉर्म परतल्यामुळे हिंदुस्थानचे टेन्शन काहीसे कमी झाले आहे. त्यातच तळाला हार्दिक पंडय़ाही यशस्वी ठरतोय. ही हिंदुस्थानी संघाची जमेची बाजू आहे.
हिंदुस्थानला चॅम्पियन्सची संधी
चॅम्पियन्स ट्रॉफीत संभाव्य विजेत्यांच्या यादीत हिंदुस्थानचेही नाव आघाडीवर होते. पण त्यात ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर होता. मात्र आतापर्यंतची कामगिरी पाहता दुबईचे वारे हिंदुस्थानच्या बाजूने घुमू लागले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत विजयाचा चौकार ठोकण्यासाठी हिंदुस्थानचे गोलंदाज सज्ज झाले आहेत. शमी, वरुण चक्रवर्थीने जो मारा केलाय तो सर्वांना चक्रावून सोडणारा आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अपेक्षित खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे हिंदुस्थानचे पारडे जड आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांना आपल्या लौकिकानुसार खेळ करता आलेला नाही. तरीही नवोदित बेन ड्वारशुईसने सर्वांना प्रभावित केले आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजी ट्रव्हिस हेडच्या फटक्यांवर अधिक अवलंबून आहे. ज्याने 2023च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये एकटय़ानेच गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या होत्या. त्याला लवकर बाद करणे हेच हिंदुस्थानसमोर सर्वात मोठे आव्हान असेल.
संभाव्य संघ
- हिंदुस्थान – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, के.एल. राहुल, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्थी
- ऑस्ट्रेलिया – ट्रव्हिस हेड, जॉश इंगलीस, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कूपर कोनोली, ऍलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वारशुईस, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, ऍडम झम्पा.