Padmakar Shivalkar – अतृप्त महत्त्वाकांक्षा

तब्बल 25 वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई क्रिकेटसाठी घाम गाळला. 124 सामन्यांत 589 विकेट टिपल्या. मुंबईच्या दहा रणजी जेतेपदांमध्ये चॅम्पियन फिरकीवीराची भूमिका साकारली. हे केवळ लाजवाब होतं. क्रिकेटच्या मैदानावर त्यांनी निभावलेली भूमिका ऑस्करच्या तोडीची होती. जर हा ऑस्करचा पुरस्कार सोहळा असता तर ‘…अॅण्ड अवार्ड गोज टू पद्माकर शिवलकर’ अशी घोषणाही झाली असती. पण हे भाग्य क्रिकेट चॅम्पियन शिवलकरांच्या कारकीर्दीला लाभलं नाही.

हिंदुस्थानी संघात एक संधी मिळावी म्हणून ते चक्क वयाच्या 47 व्या वयापर्यंत जोरदार खेळले; पण या दिग्गजाला किमान एक संधी तरी द्यावी असं एकाही राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्याला वाटलं नाही, ना हिंदुस्थानी संघाच्या कर्णधारांना वाटलं नाही.

आयुष्यभर हिंदुस्थानी संघात संधी न मिळाल्याची भळभळती जखम घेऊन शिवलकर अश्वत्थामासारखे खेळ खेळ खेळले, पण कुणालाही त्यांची जखम दिसली. कुणालाही त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली नाही. त्यांच्या फिरकीची कदर करावी असं कुणालाही वाटलं नाही याचं दुःख आयुष्यभर सतावणार. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी लिहिलेल्या आपल्या आत्मचरित्रात आपल्या अतृप्त महत्त्वाकांक्षेबद्दल म्हटलं होतं की, मला एका सामन्यासाठी संघात घ्यायला हवे होते. कारकीर्दीत आपल्यावर वारंवार अन्याय झाल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली होती. तेव्हा जाणवलं की, त्यांच्यावर जो अन्याय झाला तो इतरांवर झाला असता तर शंभरपैकी नव्याण्णव जणांनी निराश होऊन क्रिकेट सोडलं असतं. पण शिवलकर इतरांपेक्षा वेगळे होते.

आपल्याला तृप्त करणारी गोष्ट मिळत नसल्यामुळे ते अतृप्त होऊन आयुष्यभर खेळत राहिले. एक संधी मिळेल म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावले. आपल्याला एक कसोटी सामना खेळायला मिळाला असता तर आपण इतकी वर्षे क्रिकेट नक्कीच खेळलो नसतो, अशीही भावना त्यांनी बोलून दाखवली होती. कसोटी खेळणे हीच त्यांची अतृप्त महत्त्वाकांक्षा होती. ती पूर्ण करण्यासाठीच आपण प्रयत्न करत राहिलो. ती पूर्ण झाली असती तर आपण तेव्हाच तृप्त झालो असतो, असेही ते म्हणाले होते. एक अफाट उत्साहाचा झरा एका अतृप्त महत्त्वाकांक्षेसह आम्हाला सोडून गेला. त्यांच्या गोलंदाजीचं टॅलेंट कुणालाच दिसलं नाही याचं दुःख वाटत नाहीय, चीड येतेय. ते गेले असले तरी शिवलकरांचा अतृप्त आत्मा शेवटपर्यंत भटकतच राहणार.