मुंबईत मराठी माणसाला घर खरेदीसाठी आरक्षण द्या, पार्ले पंचम संघटनेचे आमदारांना पत्र

मुंबईत दिवसेंदिवस घरांचे भाव गगनाला भिडत असून कोट्यवधी किमतीची घरे सर्वसामान्य मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. त्यामुळे मराठी माणसाला घर खरेदीसाठी आरक्षण हवे, अशी मागणी ‘पार्ले पंचम’ या संस्थेने केली आहे.

अधिवेशनाच्या तोंडावर ‘पार्ले पंचम’ या संस्थेने सर्व आमदारांना हे पत्र पाठवले आहे. अधिवेशनात या विषयावर चर्चा घडवावी, मराठी माणसाला घर विक्रीत आरक्षण देण्याबाबत विधेयक आणून मंजूर करून घेतल्यास मुंबईतील मराठी माणसाच्या गळचेपीला काही प्रमाणात आळा बसेल, असे या पत्रात म्हटले आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर म्हणाले, नवीन इमारतीतील घरे सामान्य मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. मराठी माणसांना मांसाहारी असल्यामुळे विकासक विविध कारणे सांगून घर विकण्यास तयार होत नाहीत. यामुळे मुंबईतील मराठी टक्का घसरत आहे.