
मुंबई विद्यापीठातर्फे यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या तब्बल दीड लाखाहून अधिक पदवी प्रमाणपत्रांवरील बोधचिन्हातील मुंबई विद्यापीठाचे इंग्रजीतील नाव चुकल्याने ही प्रमाणपत्रे मागे घेण्याची नामुष्की विद्यापीठावर आली आहे. इंग्रजी Mumbai ऐवजी Mumabai छापल्याने ही प्रमाणपत्रे मागे घ्यावी लागणार आहेत. प्रमाणपत्रे छपाईचे काम हैदराबादमधील एका खासगी कंपनीला देण्यात आले होते.
मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा 7 जानेवारीला पार पडला. त्यानंतर 1.64 लाख विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. ही प्रमाणपत्रे संबंधित कॉलेजात देण्यात आली होती. काही कॉलेजांनी ती विद्यार्थ्यांना वाटलीदेखील. प्रमाणपत्रावरील बोधचिन्हाची स्पेलिंग चुकल्याचे काहींच्या लक्षात आले. त्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.
सुरुवातीला केवळ एक हजार प्रमाणपत्रे सदोष असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले, परंतु आता रूपारेल, व्हीजेटीआय, पोद्दार अशा सर्वच महाविद्यालयात सदोष बोधचिन्ह असलेली प्रमाणपत्रे गेल्याचे समजते आहे, असे युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.
या प्रकारामुळे परीक्षा विभागाचा गोंधळ सर्वांसमोर आला आहे. या सदोष प्रमाणपत्रांमुळे परदेशात किंवा अन्य विद्यापीठांत प्रवेश घेणारे विद्यार्थी अडचणीत येऊ शकतात. तसेच त्यांची नोकरी अडचणीत येऊ शकते. सदोष प्रमाणपत्रे आता विद्यापीठाकडून परत घेतली जात आहेत.
सदोष प्रमाणपत्रांमुळे कॉलेज आणि विद्यार्थ्यांना होणाऱया त्रासाची दखल घेत युवासेनेच्या नेत्यांनी कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुळकर्णी आणि प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचडे, परमात्मा यादव, स्नेहा गवळी, किसन सावंत, व्यवस्थापन परिषद सदस्य उपनेत्या शीतल शेठ आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांचा या बैठकीत सहभाग होता.
चौकशी करणार
या सर्व प्रकाराची चौकशी करण्याकरिता विद्यापीठाने समिती नेमली आहे. प्रमाणपत्रे छापणारी कंपनी खासगी आहे, मात्र ती छापायला देण्यापूर्वी मजकुराचे प्रूफ रीडिंग नीट न झाल्याने लोगोतील स्पेलिंग चुकली आहे. त्यामुळे या प्रकाराला परीक्षा विभागातील कोण कोण जबाबदार आहेत, याची चौकशी केली जाणार आहे.