
गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांनाच हल्ली टॅटूच्या वेडाने पछाडले आहे. परंतु टॅटू काढण्याकरिता जी शाई वापरली जाते, ती कशापासून बनलेली असते, याचा कधी विचार केला आहे का? टॅटूकरिता वापरण्यात आलेली शाईच नव्हे तर सुईदेखील त्वचेकरिता घातक ठरू शकते. अमेरिकेत तर त्यामुळे रक्ताचा कॅन्सर होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने टॅटू पार्लरवरचे नियमन करण्याकरिता पुढाकार घेतला आहे.
टॅटूच्या शाईत अल्कोहोल, बेरियम, कॅडमियम, कॉपर, काच, पारा, निकेल, प्लॅस्टिक आणि व्हेजिटेबल डाय असे घटक असतात. कर्नाटक सरकारच्या फूड ऍण्ड सेफ्टी डिपार्टमेंटने केलेल्या पाहणीत या शाईत 22 विविध प्रकारचे धातू आढळून आले. याबाबत कर्नाटक सरकारने केंद्राला पत्र लिहून टॅटू पार्लरकरिता देशव्यापी नियमावली तयार करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातही गल्लीबोळात टॅटू पार्लर्स आढळून येतात. सध्या त्यांच्यावर कुणाचेच निर्बंध नाहीत. कर्नाटक सरकारला सुचलेले शहाणपण महाराष्ट्र सरकारला कधी सुचणार?