सामना अग्रलेख – भिकारी बनविण्याची फॅक्टरी

भारतीय जनता पक्ष त्यांच्या मंत्र्यांचा अहंकार अधूनमधून उफाळून येत असतो. ‘‘सरकारसमोर हात पसरण्याची म्हणजे भीक मागण्याची सवय लोकांना लागली आहे,’’ ही भाजपचे एक नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल यांनी उधळलेली मुक्ताफळे याच अहंकाराचा नमुना आहे. भिक्षेकऱ्यांचे सैन्य उभारून समाज बलवान बनवता येत नाही, असेही मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले खरे, पण हे भिक्षेकरी अंधभक्तांचे सैन्य बनविण्याची फॅक्टरी भारतीय जनता पक्षच आहे. ‘मोफत’, ‘लाचारयोजनांचे जनकत्व तुमच्याकडेच जाते. गौतम अदानींसारख्या श्रीमंतांना हात पसरताही सर्व मिळते एखादा गरीब मागणीपत्र घेऊन सरकार दरबारी जातो तेव्हा तो भिकारी ठरतो. भाजप राज्यात भ्रष्टाचारी आणि गद्दार दलबदलूंना मानसन्मान आहे. गरीबांनी फक्त मते द्यायची, तीदेखील ठोक भावात!

भारतीय जनता पक्षाने लोकांना वाईट सवयी लावून ठेवल्या व आता त्याच भाजपचे नेते लोकांना ‘भिकारी’ म्हणून हिणवत आहेत हे बरे नाही. भाजपचे एक नेते व मध्य प्रदेशातील मंत्री प्रल्हाद पटेल म्हणतात, ‘‘सरकारसमोर हात पसरण्याची, भीक मागण्याची सवय लोकांना पडली आहे. नेता आला रे आला की, त्याच्या गळ्यात हार घालायचे आणि मागण्यांचा कागद हातात द्यायचा ही काही चांगली सवय नाही. अशाने संस्कारी समाज निर्माण होणे कठीण आहे.’’ प्रल्हाद पटेल यांनी जे ज्ञानामृत उधळले आहे, त्यावर भाजपनेच एक चिंतन शिबीर घेण्याची गरज आहे. जनता जर सरकारकडे हात पसरत असेल, म्हणजेच भीक मागत असेल तर जनतेवर ही वेळ कोणी आणली? अकरा वर्षांपासून देशावर भारतीय जनता पक्षाचा एकछत्री अंमल आहे व ‘सब कुछ मोदी मोदी’चा नारा आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’ हा भाजपचा निवडणुकीतील मंत्र आहे. 2014 मध्ये सत्तेत येण्यापूर्वी लोकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न मोदींनीच दाखविले आणि मते मिळवली. शिवाय वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचा वादादेखील त्यांनी केला होता. मात्र यापैकी एकही वादा अकरा वर्षे सलग सत्तेत असलेल्या मोदी सरकारने पूर्ण केला नाही. त्यामुळेच लोकांना सरकारसमोर हात पसरण्याची, लाचार होण्याची वेळ आली आहे. आज देशात तासाला दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आपल्या अन्नदात्याची ही अवस्था तर इतरांची काय असणार? भारताला पाच मिलियन डॉलर्सची आर्थिक महाशक्ती बनविणार असे स्वप्न पंतप्रधान मोदी दाखवत असतात, पण जागतिक बँकेने मोदी यांच्या

दाव्याची हवाच

काढली. जागतिक बँकेच्या ‘रिपोर्ट’नुसार मोदी काळात भारत देश 1990 पेक्षाही गरीब देश बनला आहे. एका गरीब देशाची दरडोई कमाई 576 रुपये असायला हवी. भारतात ही कमाई 181 रुपयांपेक्षाही कमी आहे. पुन्हा अशा 85 कोटी लोकांना मोदी हे महिन्याला माणशी दहा किलो धान्य फुकट देतात. ही भीक आहे व मोदींनी भारत देशातील मोठ्या लोकसंख्येस भिकारी बनवले. पुन्हा राज्याराज्यांत ‘लाडके भाऊ’, ‘लाडक्या बहिणी’ अशा योजनांतून खात्यात पैसे जमा केले जातात. हे सर्व करण्यामागे मते विकत घेणे व सत्ता कायम ठेवणे हाच हेतू आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मालास न्यूनतम समर्थन मूल्य मागितले आहे. आमच्या मालास योग्य भाव द्या, म्हणजे आम्हाला सरकारपुढे भिकाऱ्यासारखे हात पसरावे लागणार नाहीत ही शेतकऱ्यांची भूमिका आहे व ती योग्यच आहे. शेतकरी स्वतः आत्मनिर्भर होऊ पाहतोय व मोदी सरकार त्यांना आपल्या दारातले भिकारी करू पाहतेय. गरिबी, अंधश्रद्धा आणि धर्मांधता वाढवून लोकांना आपल्यावर अवलंबून ठेवायचे हे सध्याच्या सरकारचे धोरण आहे. गरीब, भिकारी लोक हे अंधश्रद्धाळू आणि धर्मांध बनतात. भाजपला नेमके तेच हवे. भाजपच्या धर्म पंडितांनी व धर्म प्रचारकांनी कधी रोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य यावर चर्चा केली आहे काय? ते ‘बटेंगे तो कटेंगे’ वगैरे बोलतात, पण शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या समस्यांवर बोलत नाहीत. भारतातील लोकसंख्या भिकारी व गरीब ठेवल्याचा आणखी एक फायदा म्हणजे या मतदारांना विकत घेता येते. त्यांची मते घाऊक भावात विकत घ्यायची नाहीतर मतदानाच्या आदल्या रात्रीच त्या गरीबांच्या बोटाला शाई लावून मतदानाला न येण्याची किंमत द्यायची. त्यामुळे सरकार गरीबांच्या

विकत घेतलेल्या मतांवर

निवडून येते व ते गरीबांना गरीब ठेवण्याचेच धोरण राबवते. हेच गरीब त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे हात पसरतात तेव्हा भाजपचे मंत्री व नेते त्यांची ‘भिकारी’ म्हणून हेटाळणी करतात. भारत देशाची ही परिस्थिती गंभीर आहे. भारताचा आर्थिक पाया खचलेला आहे व देशाचा मनोरा कलंडला आहे. प्रयागराजच्या महाकुंभात 80 कोटी लोकांनी स्नान केले यावर सरकार खूष आहे. यात 75 कोटी हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारे, मोदींच्या फुकट धान्य योजनेचा लाभ घेणार लोक आहेत. ते प्रयागराजला चेंगराचेंगरीत मेले तसे दिल्ली रेल्वे स्थानकावरून कुंभाला जाण्याच्या गर्दीतही चिरडून मेले. सरकार म्हणेल, ‘‘चला, दोनेक हजार भिकारी आणि लाभार्थी कमी झाले.’’ भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मंत्र्यांचा अहंकार अधूनमधून उफाळून येत असतो. ‘‘सरकारसमोर हात पसरण्याची म्हणजे भीक मागण्याची सवय लोकांना लागली आहे,’’ ही भाजपचे एक नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल यांनी उधळलेली मुक्ताफळे याच अहंकाराचा नमुना आहे. भिक्षेकऱ्यांचे सैन्य उभारून समाज बलवान बनवता येत नाही, असेही मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले खरे, पण हे भिक्षेकरी व अंधभक्तांचे सैन्य बनविण्याची फॅक्टरी भारतीय जनता पक्षच आहे. ‘मोफत’, ‘लाचार’ योजनांचे जनकत्व तुमच्याकडेच जाते. गौतम अदानींसारख्या श्रीमंतांना हात न पसरताही सर्व मिळते व एखादा गरीब मागणीपत्र घेऊन सरकार दरबारी जातो तेव्हा तो भिकारी ठरतो. भाजप राज्यात भ्रष्टाचारी आणि गद्दार दलबदलूंना मानसन्मान आहे. गरीबांनी फक्त मते द्यायची, तीदेखील ठोक भावात!