
>> सनत्कुमार कोल्हटकर, [email protected]
ट्रम्प सरकारचा खर्च कमी करण्यासाठीच्या इतर उपाययोजनांच्या सोबतच ‘एलॉन मस्क’ यांनी अमेरिकेच्या फेडरलकडे असणाऱ्या सोन्याच्या राखीव साठ्याची तपासणी करण्याची मागणी केलेली आहे. ही अमेरिकेची अंतर्गत बाब असली तरी या तपासणीचा निष्कर्ष धक्कादायक असू शकतो आणि त्याचा अमेरिकन डॉलरच्या आंतरराष्ट्रीय मूल्यावर मोठा प्रभाव पडू शकतो. अमेरिकेच्या ‘फोर्ट नॉक्स’मध्ये ठेवण्यात आलेल्या राखीव सोन्याच्या साठ्यात मोठी तफावत आढळून आली तर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीवर मोठा प्रभाव दिसून येऊ शकतो तसेच अमेरिकन डॉलरची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते.
अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी 1982 मध्ये त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमेरिकन काँग्रेसतर्फे अमेरिकन फेडरलकडे उपलब्ध असणाऱ्या राखीव सोन्याच्या साठ्याचे परीक्षण (ऑडिट) करण्यासाठी समिती नेमली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालात अमेरिकेकडे राखीव सोने उपलब्धच नसल्याचे सांगण्यात आले होते. समितीच्या अहवालाचा हा निष्कर्ष धक्कादायक तर होताच, पण त्यावर काहीही कार्यवाहीच झाली नाही, जे जास्त धक्कादायक होते. रोनाल्ड रेगन हे रिपब्लिकन पक्षातर्फे निवडून आलेले होते हे विशेष. हे सर्व सांगावयाचे कारण म्हणजे अमेरिकेचे नवीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटतम सहकारी एलॉन मास्क यांनी फेडरलकडे प्रत्यक्ष उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आलेल्या राखीव सोन्याच्या साठ्याचे परीक्षण करण्याची मागणी केलेली आहे.
2012 मध्ये जर्मन सरकारने अमेरिकेला त्यांच्या ‘ट्रेझरी’मध्ये जर्मनीच्या मालकीचा असलेला राखीव सोन्याचा साठा परत देण्याबद्दल सांगितले होते. तो साठा लगेच परत करण्यास अमेरिकेने असमर्थता दर्शवली होती. सुमारे 7 वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजे 2017 मध्ये अमेरिकेने जर्मनीला त्यांच्या अमेरिकेकडे ठेवलेल्या राखीव सोन्याच्या सायापैकी फक्त निम्मा साठा परत केला होता. उर्वरित सोन्याचा साठा जर्मनीला परत देण्याबाबत अमेरिकेने कोणताही कालावधी अजूनपर्यंत जर्मनीला सांगितलेला नाही. जर्मनीने एका परीने त्यांच्या मालकीच्या उर्वरित राखीव सोन्याच्या साठ्याबद्दल म्हणजे तो परत मिळण्याबद्दल आशा सोडली असल्याचे सांगितले जाते. याबद्दलच्या बातम्या तत्कालीन वर्तमानपत्रांत आलेल्या आहेत.
1972 मध्ये अमेरिकन डॉलरची छपाई त्याच्याकडे उपलब्ध असणाऱ्या राखीव सोन्याच्या साठ्याशी जोडलेली होती. त्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते रिचर्ड निक्सन. त्यांनी अमेरिकन डॉलर या चलनाच्या उपलब्धतेचा राखीव सोन्याच्या साठ्याशी असणारा संबंध तोडून टाकला होता. त्यानंतरच्या काळात अमेरिकन डॉलरची जगातील अनेक देशांमध्ये असणारी स्वीकारार्हता बघता आणि संपूर्ण जगामध्ये पेट्रोल खरेदी विक्रीसाठी ‘पेट्रो डॉलर’ हेच एकमात्र चलन लागू करण्यात आल्यामुळे अमेरिकन डॉलर्सची अमर्यादित छपाई सुरू करण्यात आली होती, त्याबरोबरच अमेरिकेकडून व्हिएतनाम, आखातातील देश येथील युद्धामध्ये डॉलरचा प्रचंड वापर करण्यात आल्यामुळे निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी (निवृत्तीवेतन, वैद्यकीय ) होणाऱ्या खर्चामुळे अमेरिकन महसुलात येणारी तूट थांबविण्यासाठी अमेरिका जास्तीत जास्त डॉलरची छपाई करून ती तूट भरून काढत होती, पण हे एका प्रकारचे अंतर्गत कर्जच होते. त्या कर्जाचा आकडा एवढा वाढत गेला की, त्यावरील फक्त व्याजाचाच आकडा सुमारे 36 ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. अमेरिका जेवढा संरक्षण साहित्य बनविण्यासाठी खर्च करते त्याच्यापेक्षा हा अंतर्गत कर्जावरील व्याजाचा आकडा जास्त आहे. ही धोक्याची मोठी घंटा असून त्यामुळेच एलॉन मस्क हे वारंवार अमेरिका ‘दिवाळखोर’ झाली असल्याचे सूचित करत आहेत.
ट्रम्प सरकारचा खर्च कमी करण्यासाठीच्या इतर उपाययोजनांच्या सोबतच ‘एलॉन मस्क’ यांनी अमेरिकेच्या फेडरलकडे असणाऱ्या सोन्याच्या राखीव साठ्याची तपासणी करण्याची मागणी केलेली आहे. ही अमेरिकेची अंतर्गत बाब असली तरी या तपासणीचा निष्कर्ष आश्चर्यजनक असू शकतो आणि त्या निष्कर्षांचा अमेरिकन डॉलरच्या आंतरराष्ट्रीय मूल्यावर मोठा प्रभाव पडू शकतो. या तपासणीच्या निष्कर्षामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात ‘उलथापालथ’ होऊ शकते. अमेरिकेच्या ‘फोर्ट नॉक्स’मध्ये ठेवण्यात आलेल्या राखीव सोन्याच्या साठ्यात मोठी तफावत आढळून आली तर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीवर मोठा प्रभाव दिसून येऊ शकतो तसेच अमेरिकन डॉलरची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. ‘डी-डॉलरायझेशन’च्या प्रक्रियेला मोठी गती येऊ शकते. अमेरिकेच्या फेडरलकडून चीन, जपान, भारत यांच्याकडे ठेवण्यात आलेल्या ‘ट्रेझरी बॉण्ड्स’च्या मूल्यावरही याचा मोठा प्रभाव दिसून येऊ शकेल.
1990च्या सुमारास भारताने इंग्लंडकडे सुमारे 300 टन सोने इंग्लंडकडे ठेवले होते, असे सांगण्यात येते आणि त्याची भारतातील सर्व वर्तमानपत्रांत वाच्यताही झाली होती. भारताकडे असणारा विदेशी चलनाचा साठा जवळ जवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने भारताने हे सोने गहाण ठेवले होते. त्यापैकी सुमारे 100 टन सोने भारताने मागील वर्षी परत आणले होते हे वाचकांना आठवत असेलच. भारताच्या मालकीचे सुमारे 200 टन सोने अजूनही इंग्लंडच्या व्हॉल्टमध्ये असणे अपेक्षित आहे, पण आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्ये येणाऱ्या बातम्या बघता इंग्लंडकडे सोने उपलब्धच नसल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेनेही त्यांच्या फेडरलने इंग्लंडकडे ठेवण्यात आलेले सोने अमेरिकेत परत आणल्याचे सांगितले जाते.
जगातील अनेक देशांमध्ये स्थानिक चलनाची बाजारात असणारी उपलब्धता ही त्या देशाकडे असणाऱ्या राखीव सोन्याच्या साठ्याशी निगडित असते असे सांगतात. त्यामुळे एखाद्याने त्याच्याकडे उपलब्ध असणारे चलन रिझर्व्ह बंकेला देऊन त्या चलनाच्या समतुल्य मूल्याच्या सोन्याची मागणी केली तर ते सोने उपलब्ध करून देणे त्या देशातील सरकारला त्या ग्राहकाला देणे क्रमप्राप्त आहे. थोडक्यात, बाजारात जेवढे एकूण चलन वापरात आहे त्या चलनाच्या समतुल्य मूल्याचा सोन्याचा साठा त्या त्या देशातील प्रमुख बँकेकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. तेवढा साठा उपलब्ध नसेल तर त्या चलनाची बाजारातील किंमत घसरणे हे अपेक्षित धरले जाते. अर्थात याची खरीखुरी माहिती सरकारकडेच उपलब्ध असल्याने सरकार जेवढी माहिती सार्वजनिक करते त्यावर विश्वास ठेवणे क्रमप्राप्त आहे हे सांगणे न लगे.
रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यानंतर अमेरिकेकडून रशियाच्या अमेरिकेकडे असणाऱ्या डॉलरच्या ठेवींवर निर्बंध टाकण्यात आलेले होते. त्यामुळे रशियाला त्यांच्या स्वतःच्या चलनाचे म्हणजे ‘रुबल’चे व्यवहार वाढविण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. रशियन ‘रुबल’चा वापर जसजसा आंतरराष्ट्रीय व्यवहारात वाढत गेला तसतसे अमेरिकन डॉलरला वगळून रशियन क्रूड विक्रीचे रुबलमधील व्यवहार वाढू लागले. त्यामुळे अमेरिकन डॉलरला त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील पत कायम राखण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारात स्थान राखून असलेल्या ‘ब्रिक्स’ देशांनी पण अमेरिकन डॉलरला वगळून व्यापार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे अमेरिकेला अमेरिकन डॉलरची बाजारातील उपलब्धता आणि त्यांच्याकडे उपलब्ध असणारा राखीव सोन्याचा प्रत्यक्ष साठा तपासणे आवश्यक ठरते आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या अमेरिकन फेडरलकडील साठ्याबद्दल समोर येणाऱ्या धक्कादायक निष्कर्षांचा कोणता परिणाम होणार आहे, याकडे बारीक लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे.