
सामान्य माणसांची कामे सोडून महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांमध्ये भांडणे सुरु आहेत. शिंदे गटाच्या कामावर स्टे देण्याचा सपाटा या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) यांनी लावला आहे. तुमच्या तुमच्यातच एकमत नाही तर, या गरीब आणि सामान्य शेतकऱ्यांना तुम्ही काय न्याय देणार आहात, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने यवतमाळ येथे आंदोलन करण्यात आलं. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. संजय देशमुख म्हणाले की, ”कुठेत आपले पालकमंत्री? गंगेत डुबक्या मारण्यापेक्षा या भागातील गरीब, सामान्य, बंजारा, शेतकऱ्यांना न्याय द्या. या ठिकाणी भ्रष्टाचार वाढला आहे.”
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ”महायुतीतील तिन्ही पक्षांनी आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं सांगितलं होतं, शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करण्यासाठी या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु, असंही सांगितलं होतं. काही दिवस सोयाबीन, कापूसची खरेदी झाली. मात्र काही दिवसांत हे बंद सुद्धा झालं. हे सरकार लोकांना खोटे आश्वसन देऊन सत्तेत आलं आहे. सत्तेत आल्यानंतर त्यांना आश्वासनांचा विसर पडला आहे.” त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पुरतात करण्याची मागणी केली आहे.