राज्याचे प्रतिनिधित्व कमी होईल, तामिळनाडू राज्याचे 8 खासदार कमी होऊ शकतात; एम. के. स्टॅलिन यांनी व्यक्त केली भीती

लोकसंख्येवर आधारीत मतदारसंघांची पुनर्रचनेचा मुद्दा सध्या देशभरात गाजत आहे. अनेक राज्यांचा याला विरोध आहे. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे अनेक राज्यांसह देशातील राजकीय गणिते बदलणार आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के, स्टॅलीन यांनीही याला विरोध केला आहे. या पुनर्रचनेमुळे तामिळनाडूचे देशातील प्रतिनिधीत्व कमी होणार असून राज्यातील आठ खासदार कमी होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी जास्तीतजास्त अपत्य जन्माला घाला आणि लोकसंख्येत आपले प्रमाण वाढवा, हाच एक उपाय आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने जास्तीतजास्त अपत्ये जन्माला घालावती, असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले आहे. स्टॅलिन यांनी राज्यातील जनतेला लवकरात लवकर मुलं जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. आम्ही पूर्वीपासूनच या समस्येकडे लक्ष वेधत आहोत. जास्त मुलं जन्माला घाला, हे आम्ही आधीपासून सांगत आहोत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर मुलं जन्मालाला घालणे आवश्यक आहे, असेही स्टॅलिन म्हणाले.

राज्यात लोकसंख्येवर आधारीत मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास राज्यातील लोकसभेच्या जागा कमी होऊ शकतात. राज्यातील आठ खासदार कमी होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूप्रमाणेच अनेक राज्यांवरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे राज्याचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होईल. तामिळनाडूची यशस्वी फॅमिली पॉलिसी प्लॅनिंग आता राज्यासाठी हानिकारक ठरताना दिसत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आपण एकत्रित येत आपल्या अधिकाराचे रक्षण करायला हवे, असे आवाहनही स्टॅलिन यांनी जनतेला केले आहे.