
देशातील शेअर बाजार सध्या मोठ्या दबावाखाली आहे. जागतीक आर्तिक अस्थिर वातावरण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण याचा शेअर बाजारावर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सातत्याने शेअर बाजारातून पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्रीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सोमवारी बाजाराची सुरुवात काहीशी तेजीत झाल्याने आता बाजार सावरेल, अशी गुतंवणूकदारांना अपेक्षा होती. मात्र, सावरता सावरता शेअर बाजार पुन्हा कोसळल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
शेअर बाजारात सोनवारीही कोणतीही सुधारणा नाही. सुरुवातील काहीशी तेजी दाखवणार बाजार आज पुन्हा घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 15.44 अंकांनी किंवा 0.02 टक्क्यांनी घसरून 73,182.66 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.02 टक्के म्हणजेच 5.40 अंकांच्या घसरणीसह 22,119.30 वर बंद झाला.बाजारात सर्वात मोठी घसरण रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये दिसून आली. कंपनीचे शेअर्स आज 2 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. तसेच एचडीएफसी बँकेचे शेअर्स 1.52 टक्क्यांनी घसरले आहेत.
बाजाराची सुरुवात थोडी सकारात्मक झाली होती. मात्र, दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला आहे. आठवड्याच्या सुरुवातील सोमवारी शेअर बाजारात तीव्र चढउतार दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही कंपन्यांनी सकारात्मक वाढीसह व्यवहार सुरू केला. एकेकाळी सेन्सेक्स 400 पेक्षा जास्त अंकांनी वाढला होता, पण अवघ्या अर्ध्या तासात दोन्ही निर्देशांक पुन्हा रेड झोनमध्ये आले. सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकापासून जवळपास 850 अंकांनी घसरला होता. तर निफ्टी दिवसाच्या उच्चांकावरून सुमारे 250 अंकांनी घसरून 22,000 अकांवर पोहचला होता.
सरकारी बँका आणि औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. दुसरीकडे, ऑटो, कॅपिटल गुड्स आणि मेटल शेअर्समध्ये वाढ दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 17 समभाग घसरणीसह व्यवहार करत होते. इंडसइंड बँक, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक आणि अदानी पोर्ट्स यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांचे शेअर 3.28 टक्क्यांपर्यंत घसरले.