जागतिक वन्यप्राणी दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी गीरच्या अभयारण्याला दिली भेट, कॅमेऱ्यात टिपले खास क्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक वनजीव दिनानिमित्त जुनागढच्या गीर अभयारण्याला भेट दिली. तसेच इथल्या सिंह सदनात त्यांनी मुक्कामही केला.

एक्सवर पोस्ट करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, सामूहिक प्रयत्नांमुळे आशियाई सिंहांची संख्या वाढली आहे. तसेच सिंहांची संख्या वाढवण्यात या भागात राहणारे आदिवासी आणि महिलांचांही सिंहाचा वाटा आहे असेही मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सिंह आणि छाव्यांचे खास क्षण कॅमेऱ्यात टिपले

सिंह सदनातून पंतप्रधान मोदी जंगल सफारीला गेले. यावेळी त्यांच्यासोबत काही मंत्री आणि वनविभागाचे काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. तेव्हा मोदी म्हणाले की, आज जागतिक वन्यजीव दिनी मी गिरच्या सफारीला आलो. गीर हे जंगलाचा राजा आशियाई सिंहाचे घर आहे. मुख्यमंत्री असताना जी कामं केली होती, त्या कामांची आठवण झाली असेही मोदी म्हणाले.

 

आशियाई सिंहासाठी केंद्र सरकारने प्रोजेक्ट लायन प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पासाठी सरकारने 2900 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. आशियाई सिंह हे फक्त गुजरातमध्ये आढळतात. आशियाई सिंहांचा गुजरातच्या ९ जिल्ह्यातील 53 तालुक्यांच्या 30 हजार वर्ग किमी भागात अधिवास आहे.