
पानटपरींवर गांजा, एम. डी. पावडर असे अमली पदार्थ पानामध्ये मिसळून शाळा व कॉलेजमधील मुलांना सर्रासपणे विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील पानपटऱ्यांवर सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने पाच पानटपऱ्यांवर छापे टाकून धडक कारवाई केली. टपरींमध्ये मिळून आलेली पावडर व पानात मिसळायचे अन्य साहित्य ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. अन्न प्रशासनाचा अहवाल आल्यानंतर संबंधित पानटपरी मालक व चालक यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
प्रेम बाळासाहेब जाधव (वय १९, रा. शिलाटणे, ता. मावळ) चैतन्य पान शॉप, नरेश नगाराम सूर्यवंशी (वय ४५, रा. लोणावळा, ता. मावळ) यांचे नरेश पान शॉप, विनायक शंकर दहिभाते (वय २८, रा. कामशेत, ता. मावळ) यांचे साईरतन पान शॉप, निखिल हरिदास आझाणकर (वय २४, रा. पांगोळली, ता. मावळ) यांचे महालक्ष्मी पान शॉप, राहुल सुनील शेलार (वय २१, रा. औंढे, ता. मावळ) यांचे पैलवान पान शॉप या पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या टपरींची तपासणी केली असता, टपरीमध्ये मिळून आलेल्या पावडर व इतर पानात मिक्स करणारे साहित्य ताब्यात घेण्यात आले.
पोलीस स्टेशनकडून टपरीचालक व मालक यांना कायदेशीर लेखी नोटीस देण्यात येणार आहे. तसेच लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटरच्या आवारातील तंबाखू व इतर तत्सम पदार्थ विकणाऱ्या पानटपरींवर तत्काळ कारवाई करण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले आहे. पानटपरीमालक व चालक यांनी १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, पानटपरी वेळेत बंद करावी आणि पानटपरीमध्ये १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकत देणार नाहीत, याबाबतचा बोर्ड लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच, पानटपरीमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावण्यास सांगितले.
सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस अंमलदार शेखर कुलकर्णी, हनुमंत शिंदे, आदित्य भोगाडे, अंकुश पवार, पवन कराड आदी कारवाईत सहभागी झाले होते.