गडावर अश्लील चाळे केले म्हणून हटकले, प्रेमी युगुलाची दुर्गप्रेमीला मारहाण

वीकेंडला शहरानजीक टेकड्यांसह गड, किल्ल्यांवर फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रेमीयुगलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. काहीजणांकडून तेथे फिरण्याच्या नावाखाली डांगडिंग केली जाते. यापूर्वी अनेकदा अशा घटना समोर आल्या असतानाच, आता पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले सोनोरी गडावर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलाला हटकल्याच्या कारणातून एका दुर्गप्रेमीला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 27 वर्षीय दुर्गप्रेमी प्रमोद मोहन जगताप (रा. म्हातोबाची आळंदी) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वेदांत राजेंद्र जाधव (रा. बी. टी. कवडे रोड) याच्यासह तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि.1) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोटार सायकल नंबरवरून आरोपीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडकिल्ले संवर्धन व माऊंटन ट्रेलरेस असलेले प्रमोद जगताप शनिवारी सायंकाळी सोनोरीच्या मल्हार गडावर सरावासाठी आले होते. तेथे श्री महादेव व खंडोबाचे दर्शन घेऊन फिरत असताना त्यांना झेंडेवाडीच्या बाजूकडील बुरुजाच्या जवळ एक युवक व युवती अश्लील चाळे करताना दिसून आले. त्यांना या कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी सांगितले असता, दोघांनी जगताप यांनाच दमदाटी केली. त्यांची गचांडी धरून दगडफेक केली. त्यातील युवकाने मानेवर हाताचा फास आवळला, तर तरुणीने जगताप यांना दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. याला आज संपवायचे, असे ते मारहाण करताना बोलत होते. प्रमोद जगताप यांनी कशीबशी सुटका करून गडाच्या पायथ्याशी धाव घेतली असता, तिथं उभी असलेली मोटार सायकल क्रमांक एम.एच. 12स.डी. 4446आढळून आली. जगताप यांनी जखमी अवस्थेत येऊन सासवड पोलिसांना खबर दिली. गडावरील झटापटीत जगताप यांच्या खिशातील २ हजार 100 रुपये देखील या युगुलाने लंपास केले आहेत. जखमी प्रमोद जगताप खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, सासवड पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा शहराजनीक असलेल्या पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.