
उन्हाळ्यात पाणीटंचाईने हैराण होत असलेले वाडा तालुक्यातील गोराड वडपाडा आणि वसई तालुक्यातील थळ्याचा पाडा ही गावे आता पाणीदार झाली आहेत. या गावांमध्ये गणेशपुरी येथील प्रसाद चिकित्सा या संस्थेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे. त्यामुळे गावांना आता मुबलक पिण्याचे पाणी मिळत असून ग्रामस्थांची वणवण भटकंती संपली आहे.
प्रसाद चिकित्सा संस्थेद्वारे गावकऱ्यांच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात आली आहे. या गावामध्ये मार्च महिन्यानंतर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागायची. गणेशपुरी येथील प्रसाद चिकित्सा धर्मादाय संस्थेने विहिरीसाठी नवीन जागा शोधून तिथे विहिरी खणल्या. या नवीन विहिरी बांधूनही दिल्या. त्यामुळे लोकांना आता भरपूर प्रमाणात पाणी मिळाले आहे. त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंतीपण थांबली आहे. पाण्यासाठी होणारी वणवण भटकंती आता पूर्णपणे थांबली आहे. पिण्याचे पाणी भरण्यासाठी महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यांची आता या त्रासातून सुटका झाली आहे.
पाणी जमा करणे हे मोठे आव्हान होते
यापूर्वी मार्च महिना सुरू झाल्यांनतर गाव आणि परिसरात पाणीटंचाई निर्माण होत होती. त्यामुळे पाणी जमा करणे हे फार मोठे आव्हान होते. पाणी हे घरातील मुख्य काम असायचे. मात्र आता गावात मुबलक पिण्याचे पाणी येत असल्याने या त्रासातून आता आमची सुटका झाली आहे, अशी प्रतिक्रिया सुजाता वळवी यांनी व्यक्त केली आहे.
11 नवीन विहिरी खोदल्या
पाण्यासाठी होत असलेली भटकंती दूर करण्यासाठी आतापर्यंत 11 नवीन विहिरी खोदण्यात आल्या असून 15 विहिरींची दुरुस्ती करण्यात आली आहे. आदिवासी भागात नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आजतागायत 2 हजार 558 वॉटर फिल्टर वाटप करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना 55 विहिरी बांधून देण्यात आल्या आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना दुबार पीक घेता यावे हा मुख्य उद्देश आहे. यासाठी क्रोडा कंपनी, रोटरी क्लब आणि प्रसाद प्रोजेक्ट यांचे सहकार्य लाभले, असे संस्थेचे कार्यकारी व्यवस्थापक मिलिंद नरगुंद यांनी स्पष्ट केले आहे.