
पालघर नगर परिषदेने 2025-26 या वर्षात शहरात विकासकामे करण्यासाठी 172 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला आहे. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा योजना सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शहरातील पर्यावरणाचा स्तर उंचावण्यासाठी विविध भागांत मियावाकी जंगलाची निर्मिती करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पालघरमधील मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले नव्हते. नवीन आर्थिक वर्षात यासंदर्भात निविदा काढून पुनर्मूल्यांकनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या सर्व कर आकारणी कागद विरहित करण्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनेच्या सक्षमीकरणासाठी 18 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासह विविध विकासकामांसाठी तसेच सौरऊर्जा उत्पादनासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
■ पालघर नगर परिषदेच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या कार्यालयीन इमारतीसाठी 100 किलो व्हॅट सौरऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या इतर पाच इमारतींसाठी 170 किलो व्हॅट सौरऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
■ शहरात वाचनालय उभारण्याचे काम पूर्ण करण्यासोबत ई-वाचनालय सुविधा उभारण्यासाठी 30 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला असून महिला बालकल्याण व अपंग विभाग अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ दोन टप्प्यांत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
■ पालघर गणेशकुंड भागात सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून शौचालय उभारणी करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या मालकीची उद्याने व अत्याधुनिक शौचालय उभारण्याचीदेखील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
■ स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिनी उभारण्यासाठीदेखील प्रस्तावित आहे. शहरातील अतिक्रमण दूर करण्यासाठी कायमस्वरूपी अतिक्रमणविरोधी पथक स्थापन करण्याची अर्थसंकल्पात तरतूद केल्याची माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सांगितले.