विकास आराखड्याविरोधात कळवावासीय रस्त्यावर, 45 हजार रहिवासी बेघर होणार

महापालिकेने नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला असल्यामुळे 45 हजार कळव्यातील रहिवासी बेघर होणार आहेत. ठाणे पालिकेच्या या आराखड्याविरोधात आज कळवावासीयांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले. कोणत्याही परिस्थितीत या आराखड्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही, याद राखा आमची घरेदारे उध्वस्त केली तर.. यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कळव्यातील नागरिकांनी दिला आहे. रविवार सुट्टीचा दिवस असूनही कळवा नाक्यावर नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. पालिकेविरुद्ध आंदोलनकर्त्यांनी घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.

ठाणे पालिकेने तयार केलेल्या नवीन विकास आराखड्यानुसार संपूर्ण कळवा खारीगाव उध्वस्त होणार आहे. आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करून साडेतीनशे ते चारशे इमारतींवर वरवंटा फिरणार आहे. त्यामुळे ४५ हजार रहिवासी बेघर होणार आहेत. त्याविरोधात रहिवाशांनी रणशिंग फुंकले. या आराखड्याची अंमलबजावणी झाली तर कळवा आणि खारीगाव भागातील तब्बल ४०० च्या आसपास इमारती बाधित होणार आहेत. गावठाण भागही उध्वस्त होणार आहे.

■ कळवा- खारीगाव येथील रहिवाशांना बेघर करून असा विकास होणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे नवीन विकास आराखड्याविरोधात आता सर्वपक्षीय एकत्र येऊन आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

■ या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, माजी विरोधीपक्ष नेते मिलिंद पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, माजी विरोधीपक्ष नेत्या प्रमिला केणी, माजी नगरसेवक महेश साळवी, अपर्णा साळवी आदी उपस्थित होते.

■ आराखड्यामुळे कळवा खाडीपुलापुढील भागात असलेल्या तीन इमारती या पूर्णपणे उध्वस्त होऊन येथील रहिवासी बेघर होणार आहेत. साधारणपणे ४५ हजारांच्या आसपास कुटुंबे थेट रस्त्यावर येणार आहेत. मंदिरे, मैदानेदेखील बाधित होत आहेत.

अधिवेशनात जाब विचारणार

स्थानिक भूमिपुत्रांच्या मुळावर नवीन विकास आराखडा येणार असेल तर तो कदापिही खपवून घेणार नाही. मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी डीपी प्लॅनवाबत आश्वासन दिले होते. आता उद्यापासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात आपण सरकारला जाब विचारणार आहोत.
जितेंद्र आव्हाड (आमदार)