
तब्बल 1 कोटी 85 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी दोघांना अखेर व्ही. पी. रोड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. धनजी राजपूत आणि विजय राजपूत अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघे मूळचे गुजरातचे रहिवासी आहेत. त्या दोघांकडून पोलिसांनी 1 कोटी 55 लाख रुपये हस्तगत केले आहेत. एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांचे गिरगाव परिसरात कार्यालय आहे. त्या कार्यालयात नरेश आणि विजय हे दोघे कामाला होते. दिवसभर काम करून ते दोघे तिथेच झोपत असायचे. व्यावसायिक यांना कामानिमित्त पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्याच्या मित्राकडून 1 कोटी 85 लाख रुपये उधारीवर घेतले होते. त्याने ती रक्कम कार्यालयातील कपाटात ठेवली होती. व्यावसायिकाने कार्यालयात पैसे ठेवल्याची माहिती नरेश आणि विजयला होती.
गेल्या महिन्यात एकाने तक्रारदार यांना पह्न करून कार्यालयात ठेवलेले 1 कोटी 85 लाख रुपये चोरी झाल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदार कार्यालयात आले. त्यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा विजय हा कपाटातील पैसे घेऊन जात असल्याचे दिसले. त्याच्यासोबत आणखी दोघेजण होते. त्याने बनावट चावीचा वापर करून पैसे चोरले. तसेच त्याने कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज देखील बंद केला. घडल्याप्रकरणी व्यावसायिकाने व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासा दरम्यान पोलिसांनी धनजीला मुंबई सेंट्रल परिसरातून ताब्यात घेतले.