पालिका पीएनजी, इलेक्ट्रिक शवदाहिन्यांवर देणार भर, मुंबईत स्मशानभूमींमधील प्रदूषणालाही बसणार आळा

मुंबईत प्रदूषणची पातळी वाढली असताना बांधकाम आणि हवा प्रदूषणाच्या नियमांची मुंबई महापालिकेकडून काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असतानाही आता स्मशानभूमींमधील होणाऱया धुराच्या प्रदूषणालाही आळा घालण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अधिकाधिक शवदाहिन्या पीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा पर्यावरणपूरक करण्यावर भर देणे सुरू केले आहे.

मुंबईत बांधकाम आणि धुरामुळे होणाऱया प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिकेचा पर्यावरण विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत असून आता स्मशानभूमींमधून होणारे धुराचे प्रदूषण रोखण्यासाठी अंमलबजावणी सुरू केली आहे.

अशी सुरू आहे अंमलबजावणी

– मुंबई शहरात एकूण 70 स्मशानभूमी असून त्यातील 57 स्मशानभूमीत लाकडांचा वापर केला जातो. त्यातील 43 स्मशानभूमींमध्ये प्रदूषण नियमांनुसार लाकडांचा वापर केला जातो. 5 पीएनजी तर 5 इलेक्ट्रिक शवदाहिन्या आहेत. 3 दाहिन्यांच्या रूपांतरणाची प्रक्रिया सुरू आहे.

– पूर्व उपनगरात 85 स्मशानभूमी असून त्यातील 78 स्मशानभूमीत लाकडाचा वापर केला जातो तर 46 स्मशानभूमीत प्रदूषणाचे नियम पाळून अंत्यविधी केला जातो. 4 पीएनजीच्या तर 2 इलेक्ट्रिक शवदाहिन्या आहेत. त्याचबरोबर 4 शवदाहिन्यांच्या रूपांतरणाची प्रक्रिया सुरू आहे.

– पश्चिम उपनगरात 108 स्मशानभूमी असून त्यातील 90 स्मशानभूमीत लाकडांचा वापर केला जातो. त्यापैकी 85 स्मशानभूमी या प्रदूषणाचे नियम पाळतात. 14 शवदाहिन्या या पीएनजीवर तर 3 इलेक्ट्रिकवर सुरू आहेत. एका शवदाहिनेच्या रूपांतरणाची प्रक्रिया सुरू आहे.