जे.जे.तील बदली कामगार ‘कायम’ होणार, चार आठवड्यात कार्यवाही करण्याचे हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश

सर जे.जे. रुग्णालयात बदली कामगार म्हणून काम करणाऱया वॉर्डबॉय, आया, सफाई कामगार व अन्य चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा कायम केली जाणार आहे. उच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

सुमारे 136 बदली कामगारांची सेवा कायम करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने 2003 मध्ये दिले होते. महाराष्ट्रीय प्रशासकीय प्राधिकरणाने हे आदेश 2022 मध्ये कायम केले. त्याविरोधात राज्य शासन व सर जे.जे. रुग्णालयाने याचिका केली होती. ही याचिका फेटाळताना न्या. अतुल चांदुरकर व न्या. मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

बदली कामगारांची सेवा कायम करण्याचे प्राधिकरणाचे आदेश योग्यच आहेत. यात हस्तक्षेप करण्यासारखा कोणताच मुद्दा नाही. त्यामुळे चार आठवडय़ांत प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी करा, असे आदेशही खंडपीठाने राज्य शासनाला दिले आहेत.

1999 पासून बदली कामगार नाहीत

1999 पासून बदली कामगार घेणे राज्य शासनाने बंद केले आहे. त्याआधी नियुक्त झालेल्या बदली कामगारांची सेवा कायम करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने 2003 मध्ये दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी राज्य शासनाने केली असती तर आतापर्यंत सर्व बदली कामगारांची सेवा कायम झाली असती, असे खंडपीठाने नमूद केले.

राज्य शासनाचा दावा फेटाळला

या बदली कामगारांची सेवा कंत्राटी होती. परिणामी त्यांची सेवा कायम करता येणार नाही, असा दावा राज्य शासनाने केला होता. हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला.