
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या माजी प्रमुख डॉ. चिंग लिंग चुंग चियांग यांना आरोपी करण्यात येणार आहे. यासाठी सरकारी पक्षाने विशेष सत्र न्यायालयात अर्ज केला. याची दखल घेत विशेष सत्र न्यायालयाने डॉ. चियांग यांना आरोपी करण्यास परवानगी दिली आहे.
डॉ. पायलने 22 मे 2019 रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेरे व डॉ. हेमा अहुजा यांच्यावर डॉ. पायलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. डॉ. पायलने डॉ. चियांग यांच्याकडे मानसिक छळाची तक्रार केली होती. त्यावर डॉ. चियांगने काहीच कारवाई केली नाही, असा दावा करत त्यांनाही याप्रकरणात आरोपी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला होता. विशेष सत्र न्यायाधीश एस. एम. तपकीरे यांनी हा अर्ज मंजूर केला.
जातीवाचक टीकेला कंटाळून डॉ. पायलने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. त्यानुसार पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.