आसाममध्ये काँग्रेसकडून स्वबळावर लढण्याचे संकेत

आसाममध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी गैरभाजप पक्ष एकत्रित लढणार असल्याची चर्चा असताना राज्यातील काँग्रेस नेतृत्वाने स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. रविवारी प्रदेशाध्यक्ष भूपेन पुमार बोराह यांनी सोशल मीडिया पोस्टमधून आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता दर्शवली. शनिवारी झालेल्या सर्व विरोधी पक्षाच्या बैठकीतून काँग्रेसचे खासदार प्रद्युत बोरदोलोई अचानक बाहेर पडल्याने विरोधकांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट झाले. बोरदोलोई हे दोनवेळा लोकसभेचे खासदार आणि मंत्री राहिले आहेत. काँग्रेस, डावे पक्ष, रायजोर दल आणि आसाम राष्ट्रीय परिषद (एजेपी) या विरोधी पक्षांची भाजपविरोधात एकत्रित लढा देण्यासाठी शनिवारी बैठक झाली.