यापुढे इंग्रजी अमेरिकेची अधिकृत भाषा, ट्रम्प यांची कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी

यापुढे इंग्रजी हीच अमेरिकेची अधिकृत भाषा असणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज याबाबतच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. त्यामुळे तब्बल 250 वर्षांच्या इतिहासात अमेरिकेला पहिल्यांदाच अधिकृत भाषा मिळाली आहे. ट्रम्प यांच्या आदेशामुळे 2000 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी स्वाक्षरी केलेले धोरण रद्द होणार आहे.

या आदेशामुळे सरकारकडून निधी मिळणाऱ्या सरकारी संस्था आणि संघटनांना इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषेत कागदपत्रे आणि सेवा सुरू ठेवायचे किंवा नाही, याची निवड करता येणार असल्याचेही कार्यकारी आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेतील तब्बल 30 हून अधिक राज्यांनी इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मंजुरी देण्याबाबतचा कायदा पारित केला आहे. अमेरिकेची अधिकृत भाषा इंग्रजी करण्यात यावी यासाठी संसदेत अनेक विधेयके मांडली, मात्र ती पारित होऊ शकली नाहीत.