शिवसेनेच्या विजयाचा इतिहास पुन्हा ठाण्यातून लिहिला जाईल! झंझावाती सुसंवाद मेळाव्यात वज्रनिर्धार

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा झंझावात आणि धर्मवीर आनंद दिघे यांची निष्ठा काय असते हे ठाण्यातील शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. ईडी लावली, छळ केला, रोजीरोटीवर वरवंटा फिरवला, आमिषे दाखवली तरी ठाण्यातील असंख्य शिवसैनिक बधले नाहीत, फुटले नाहीत. गेले ते फक्त गद्दार, नमकहराम आणि पंत्राटदार. ज्या ठाण्याने नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला पहिली सत्ता मिळवून दिली त्याच ठाण्याच्या  महानगरपालिका निवडणुकीतून शिवसेनेच्या विजयाचा अध्याय पुन्हा लिहिला जाईल, असा दुर्दम्य विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्ता सुसंवाद मेळावे होणार आहेत. या मेळाव्याचा शुभारंभ आज  ठाण्यातील एनकेटी सभागृहात झाला. मेळाव्यास पदाधिकारी व शिवसैनिकांची रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. एनकेटी सभागृह गर्दीने ओव्हरपॅक झाले होते. आता गद्दारीची कीड चिरडून टाकत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा वज्रनिर्धार यावेळी शिवसेना नेते, पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी या गद्दारांचे आजच्या रोखठोकमधून सकाळीच पुरते वस्त्रहरण केले आहे. ही गद्दारी गाडण्यासाठी तुम्ही सगळे निष्ठेने उभे राहिले आहात. ही गद्दाराची कीड चिरडून टाकत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही, असे आवाहन विनायक राऊत यांनी केले. तर मिंध्यांना फटकारे लगावताना अरविंद सावंत म्हणाले, शिवसेनाप्रमुखांवर प्रेम करणारी फौज ठाण्यात, महाराष्ट्रात आणि अवघ्या देशात एकलव्यासारखी उभी आहे. पण निष्ठावंत धर्मवीर आनंद दिघे कुठे आणि दिल्लीश्वरांचे पाय चाटणारे मिंधे कुठे, आनंदाश्रमात आनंदच उरला नाही तो लाचारांचा आणि आश्रितांचा आश्रम झाला आहे, असे सावंत यांनी सांगितले.

शिवसेना नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर भाषणाच्या सुरुवातीलाच संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘सामना’तील रोखठोक स्तंभाचा उल्लेख केला. यावेळी दानवे यांनी रोखठोकमध्ये लिहिलेल्या अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचे संवादच भरसभेत वाचून दाखवले.  मिंधे गट भाजपच्या तुकडय़ावर जगत असून असे लोक जास्त दिवस राहणार नाहीत, असे तडाखे दानवे यांनी लगावले.

शिवसैनिकांनी छळ सोसला, पण ते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठाम

ठाण्यात पहिली गद्दारी झाली. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी सगळ्या नगरसेवकांचे राजीनामे घेतले. आता गद्दारी करणारे रोज पक्ष फोडण्याचे काम करत आहेत. पक्ष फोडून ते थकले, पण गेली तीन वर्षे गद्दारांचा छळ सोसूनही शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असे शिवसेना नेते राजन विचारे यांनी ठणकावून सांगितले. मिंधे टोळीचा शेवट जवळ आला आहे. थोडं सहन करा विजय आपलाच आहे, असे आवाहनही  विचारे यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.

चोरांच्या अवलादींनी सगळे चोरले, पण निष्ठावंत शिवसैनिक पुरून उरले

गद्दारांनी, चोरांच्या अवलादींनी पक्ष चोरला, चिन्ह चोरले, बाळासाहेब ठाकरे चोरले, आनंद दिघेही चोरले. पण निष्ठावंत शिवसैनिक पुरून उरले. शिवसेनाप्रमुखांची शिवसेना पुन्हा ताकदीने उभी करूच, शिवसैनिक एकटे नाहीत, आम्ही सगळे सोबत आहोत हा विश्वास देण्याकरिता आम्ही आलो आहोत, असे प्रतिपादन शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केले.

शक्तिस्थळावर अभिवादन

सभास्थानी प्रस्थान करण्याआधी धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर सर्व शिवसेना नेत्यांनी पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केले. तत्पूर्वी कोर्ट नाका येथील घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही पुष्पार्पण करून अभिवादन केले.

उपनेते विजय साळवी, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, ओवळा माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख सचिन चव्हाण, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, आकांक्षा राणे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, प्रवक्ता अनिश गाढवे, राजेंद्र महाडिक, रोहिदास मुंडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

पदाधिकारी व कार्यकर्ता सुसंवाद मेळाव्याचा शुभारंभ रविवारी ठाण्यातील एनकेटी सभागृहात झाला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, राजन विचारे, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू या शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यास पदाधिकारी व शिवसैनिकांची रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती.

मिंध्यांच्या गुंडांचा नंगानाच, धर्मवीर आनंद दिघेंची शाल आणि हार पायदळी तुडवला

शिवसेना नेत्यांनी टेंभीनाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शाल व पुष्पहार अर्पण केला. यावेळी मिंधे टोळीचे गुंड रस्त्याच्या पलीकडून आरडाओरडा करत अत्यंत अश्लाघ्य भाषेत घोषणाबाजी करत होते. परंतु त्यांच्या या हुल्लडबाजीला न जुमानता सर्व शिवसेना नेते दिघेंच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले.  शिवसेना नेते पुढे मार्गस्थ होताच मिंधेंचे गुंड इतके बेभान झाले की त्यांनी धावत जाऊन शिवसेना नेत्यांनी दिघेंना अर्पण केलेली शाल, पुष्पहार ओढून काढला आणि तो रस्त्यावर फेकत पायदळी तुडवला.  धर्मवीर आनंद दिघे यांचा घोर अवमान मिंध्यांच्या गुंडांनी केला. समाजमाध्यमांवरून हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाणेकरांमध्ये  प्रचंड संताप पसरला.

वारसदार म्हणून मिंधेंचा जन्म गुजरातला झाला की गुवाहाटीला? संजय राऊत

टेंभीनाक्यावर धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करताना तिथे मिंधेचे चार पाच गद्दार आले त्यांनी महिलांना पुढे केले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वाहक आणि वारसदार आहोत, असे मिंधे होर्डिंग लावतात. पण यांचा वारसदार म्हणून जन्म गुजरातला झाला आहे की गुवाहाटीला? शंभर रेडे कापले तेव्हा एक जन्माला आला, असा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. ठाणेकरांना निष्ठा सांगण्याची गरज नाही. निष्ठा काय आहे हे ठाणेकरांनी वारंवार महाराष्ट्राला दाखवून दिले आहे, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.

हेराफेरी करून गद्दारांनी जिंकलेली ही शेवटची निवडणूक आहे,  छळ सोसणाऱ्या शिवसैनिकांचे हे दिवसही नक्कीच जातील सुसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या दिग्विजयाची पहिली स्वारी ठाण्यावर केली आहे आणि शिवसेनेच्या विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा ठाण्यातूनच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मिंध्यांनी शिवसेना चोरली नाही तर त्यांनी गर्दीत केलेली ही पाकिटमारी आहे, असे फटकारेही राऊत यांनी लगावले. मिंध्यांची दाढी वाघासारखी दिसते, पण काळीज मात्र उंदराचे आहे. खरे वाघ व्यासपीठावर बसले आहेत. समोर छावे बसले आहेत आणि आमचे सेनापती मातोश्रीवर बसले आहेत, असे संजय राऊत यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.